लोंबकळणारा पत्रा धोकादायक स्थितीत, छप्पर व अन्य भागांचे तुकडे कोसळण्याचे अधूनमधून प्रकार
प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेच्या न्यू मार्केटच्या पोर्तुगीजकालीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पत्रा लोंबकळत असल्याने तो रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांसाठी धोकादायक बनला आहे. त्यातच या इमारतीत आतील छप्पर व अन्य भागाचे तुकडे खाली पडत असल्याने या इमारतीची पालिकेने डागडुजी करावी, अशी मागणी येथील दुकानदारांकडून करण्यात येत आहे.
सर्वप्रथम पालिकेने हा लोंबकळणारा धोकादायक पत्रा काढावा. कारण तो खाली कोसळला, तर कोणाला लागून इजा पोहोचण्याची शक्यता आहे. सदर इमारत खूप जुनी आहे. त्यामुळे आंतून तसेच इमारतीबाहेरील काँक्रिटचे तुकडे पडण्याचे प्रकार वरचेवर घडत आले आहेत. पालिकेकडून डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मध्यंतरी काही दुकानदारांनी स्वत: पुढाकार घेऊन स्वखर्चाने शक्य ती डागडुजी करून घेतली होती. मात्र आता अन्य भागांत पडझड होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मडगाव पालिकेच्या मार्केट समितीच्या अध्यक्षा असलेल्या उपनगराध्यक्षा दिपाली सावळ यांनी आपल्या समितीच्या सदस्यांसह तसेच पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या अभियंत्यांना घेऊन न्यू मार्केटची पाहणी करावी आणि आवश्यक डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.









