20 लाख रुपये दंड वसूल : विशेष तपासणी पथकाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
वायव्य परिवहन महामंडळाच्या विशेष तपासणी पथकाने जानेवारी ते जून या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या 21,034 प्रवाशांकडून 20.19 लाख रुपये दंड वसूल केला आहे. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दणका बसला आहे.
मुख्य वाहतूक व्यवस्थापक राजेश हुद्दार यांनी तपास पथकाचा तपशील हाती घेतल्यानंतर हा आकडा समोर आला आहे. सार्वजनिक प्रवाशांना उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे बसवाहक-चालक आणि निरीक्षकांचे काम आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसेस फुल्ल होऊन धावत आहेत. अशावेळी बसवाहकांनी बस मधेच थांबवून काही प्रवाशांना खाली उतरवून तिकीट काढणे आवश्यक आहे, अशी माहिती राजेश हुद्दार यांनी दिली आहे.
वायव्य परिवहन महामंडळात उत्तम कामगिरी बजावलेल्या बसवंतप्पा उळळ्ळी, ईश्वप्पा पट्टणशेट्टी, भीमप्पा दानप्पगोळ, अमरनाथ कुंटोजी, राजेश वनसूर, गोविंद लमाणी, हुसेनसाब मुल्लाण्णावर, अशोक शिवशरण आदी बसचालकांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
महिला प्रवाशांनी शून्य तिकीट घेणे अनिवार्य
वायव्य परिवहन महामंडळाच्या व्याप्तीतील धारवाड, बागलकोट, बेळगाव, गदग, हावेरी आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील 9 विभागांमध्ये केंद्रीय कार्यालयातील विशेष पथकाने जानेवारी ते जून या कालावधीत 1,00,778 प्रवाशांची तपासणी केली आहे. यापैकी 21,034 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 20 लाख 19 हजार 459 रुपये दंड वसूल केला आहे. महिलांना मोफत प्रवास दिला जात असला तरी महिला प्रवाशांनी शून्य तिकीट घेणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहनदेखील वायव्य परिवहन महामंडळाने केले आहे.









