जोकोविच-अॅलकॅरेझ जेतेपदासाठी लढत आज
वृत्तसंस्था/ लंडन
2023 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शनिवारी झेक प्रजासत्ताकच्या बिगर मानांकित मर्केटा वोंड्रोसोव्हाने महिला एकेरीचे जेतेपद मिळवताना ट्युनेशियाच्या ओनेस जेबॉरचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. वोंडोसोव्हा ही विम्बल्डन ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी पहिली बिगरमानांकित महिला टेनिसपटू ठरली आहे. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी रविवारी येथे स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझ आणि सर्बियाचा द्वितीय मानांकित जोकोविच यांच्यात लढत होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने इटलीच्या जेनिक सिनेरचा तर अॅलकॅरेझने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा पराभव केला.
शनिवारी सेंटर कोर्टवर महिला एकेरीचा अंतिम सामना खेळवला गेला. झेक प्रजासत्ताकची बिगर मानांकित डावखुरी महिला टेनिसपटू 24 वर्षीय मर्केट वोंड्रोसोव्हाने ट्युनेशियाच्या ओनेस जेबॉरचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विम्बल्डन ‘सम्राज्ञी’चा किताब मिळवला. अखिल इंग्लंड क्लबच्या ग्रासकोर्टवर गेल्या 60 वर्षांच्या इतिहासामध्ये महिला एकेरीचे जेतेपद मिळवणारी वोंड्रोसोव्हा ही पहिली बिगर मानांकित टेनिसपटू ठरली आहे. महिला टेनिसपटूंच्या विद्यमान मानांकन यादीत वोंड्रोसोव्हा सध्या 42 व्या स्थानावर आहे.

या स्पर्धेत गेल्या वर्षी 28 वर्षीय ट्युनेशियाच्या जेबॉरला अजिंक्यपदाने हुलकावणी दिली होती. तिला अंतिम सामन्यात इलेना रिबाकिनाकडून पराभव पत्करावा लागला होता तर 2022 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेबॉरला अंतिम सामन्यात टॉप सिडेड इगा स्वायटेककडून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे जेबॉरचे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा यावेळी उद्ध्वस्त झाले. शनिवारी तिने ही स्पर्धा जिंकली असती तर ती ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी पहिली आफ्रिकन किंवा अरब महिला टेनिसपटू ठरली असती.
जेबॉर आणि वोंड्रोसोव्हा यांच्यातील या अंतिम लढतीत दोन्ही सेटमध्ये सुरुवातीला वोंड्रोसोव्हा पिछाडीवर होती. पहिल्या सेटमध्ये तिने शेवटचे चार गेम जिंकून जेबॉरवर एका सेटने आघाडी मिळवली. त्यानंतर सेटमध्ये वोंड्रोसोव्हाने शेवटचे तीन गेम जिंकून जेबॉरचे आव्हान संपुष्टात आणले. वोंड्रोसोव्हाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. 2019 साली झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत कनिष्ठ मुलींच्या गटात वोंड्रोसोव्हाने आपला सहभाग दर्शवला होता आणि तिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली होती. या सामन्यानंतर जेबॉरने वेंड्रोसोव्हाचे खास अभिनंदन करून तिच्या दर्जेदार खेळाचे कौतुक केले.

शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने जेनिक सिनेरचा 6-3, 6-4, 7-6(7-4) अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 2023 च्या टेनिस हंगामात 36 वर्षीय जोकोविचने यापूर्वी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. आता तो आठव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद मिळवून नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. पूर्वी म्हणजे 1969 साली वर्षभरातील चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन टेनिसपटूकडून झाला होता त्यानंतर आता जोकोविचला यावेळी ही संधी लाभली आहे. 2023 च्या टेनिस हंगामात विम्बल्डननंतर आता अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा बाकी राहिल. यापूर्वी स्वीसच्या रॉजर फेडररने 8 वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याचा विश्वविक्रम केला होता आणि तो अद्याप अबाधित आहे. या सेंटर कोर्टवर जोकोविचने आतापर्यंत 34 सलग सामने जिंकले आहेत. 2013 साली याच टेनिस कोर्टवर ब्रिटनच्या अँडी मरेकडून अंतिम सामन्यात जोकोविचला हार पत्करावी लागली होती.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या टॉप सिडेड अॅलकॅरेझने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा 6-3, 6-3, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. स्पेनच्या अॅलकॅरेझने ग्रासकोर्टवरील या विम्बल्डन स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. जोकोविच आणि अॅलकॅरेझ यांच्यात रविवारी पुरुष एकेरीचा अंतिम सामना अटीतटीचा अपेक्षित आहे. जोकोविच आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील 24 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. जोकोविचने 2008 साली पहिल्यांदा ग्रँडस्लॅम जेतेपद ऑस्ट्रेलियात मिळवले होते.
पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत हॉलंडचा वेस्ले कुलहॉप आणि ब्रिटनचा निल स्कुपेस्की यांनी बोपण्णा व एब्डन यांचा 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्य सामना 90 मिनिटे चालला होता. कुलहॉप व स्कुपेस्की यांचा अंतिम सामना अर्जेंटिनाचा झेबालोस आणि स्पेनचा ग्रेनोलर्स यांच्याशी होणार आहे.









