राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत, तर विरोधकांची बेंगळूरमध्ये बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी मंगळवार हा राजकीय पक्षांच्या बैठकांचा वार ठरणार आहे. या दिवशी दिल्लीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. तर बेंगळूरमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. दोन्ही बैठकांची जोरदार सज्जता सध्या होत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अधिक बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आघाडी सोडून बाहेर पडलेल्या राजकीय पक्षांना पुन्हा आघाडीत घेण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. चंद्राबाबॅ नायडूंचा तेलगु देशम पक्ष, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी आवाम पक्ष, चिराग पास्वान यांचा लोकजनशक्ती पक्ष आणि इतर पक्षांनी पुन्हा रालोआचा भाग व्हावे, यासाठी जोरदार प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहेत.
लेखी आमंत्रण पत्र
लोकजनशक्ती आणि हिंदुस्थानी आवाम पक्षाला भाजपकडून लेखी आमंत्रण देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हे आमंत्रण पाठविले असून रालोआत समाविष्ट व्हा अशी विनंती केली आहे. हे दोन्ही पक्ष 18 जुलैला रीतसर रालोआत समाविष्ट होतील अशीं शक्यता व्यक्त होत आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विकासगंगेत समाविष्ट व्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसीत देश बनविण्याचा निर्धार केला असून रालोआच्या सर्व जुन्या मित्रांनी या विकासगंगेत सहभागी व्हावे आणि आपले योगदान द्यावे असे आवाहन भाजपने केले आहे. देशाची आर्थिक प्रगती, देशाची सुरक्षा व्यवस्था, गरीबांचे कल्याण, देशाच्या सांस्कृतिक गौरवाचे पुनरुत्थान, भारताचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान इत्यादी बाबींवर पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार काम करीत आहे. मित्रपक्षांनी सहभागी व्हावे आणि सरकारला अधिक बळ द्यावे, असे आवाहनही न•ा यांनी केले.
विकासशील इन्सान पक्षही…
भाजपने सध्या बिहारवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेथील छोट्या पक्षांना रालोआचे सदस्य पक्ष बनविण्यावर भर देण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी विकसशील इन्सान पक्षाचे नेते मुकेश साहनी यांची भाजपच्या नेत्यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. हा पक्षही रालोआत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांचेही प्रयत्न
विरोधी पक्षांनी काही दिवसांपूर्वी पाटणा येथे बैठक घेतली होती. या बैठकीला 15 पक्षांची उपस्थिती होती. पुढच्या बैठकीत नेता ठरविण्याचे ठरले होते. पुढची बैठक हिमाचल प्रदेशात सिमला येथे होणार होती. तथापि, आता ती बेंगळूर येथे होईल अशी घोषणा करण्यात आली. त्यानुसार ती मंगळवारी होत आहे. या बेठकीला आम आदमी पक्ष उपस्थित राहणार की नाही, याविषयी संभ्रम आहे. पाटणा येथील बैठकीत हा पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उफाळून आले होते. यापुढे काँग्रेसची उपस्थित असलेल्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी घोषणा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे हा पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष आहे. एकत्रित विरोधी पक्षांचे नेतृत्व कोणाकडे दिले जाते हा सर्वात मोठ्या औत्सुक्याचा विषय आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी सहभागी होणार
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय उलथापालथीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती आणि अजितदादा पवार यांचा साधारणत: चाळीस आमदारांचा गट बाहेर पडून तो शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये समाविष्ट झाला आहे. या पक्षाचे नेते अजितदादा पवार रालोआच्या बैठकीला येतील अशी सूत्रांची माहिती आहे. तर एक वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडला होता. हाच गट खरी शिवसेना आहे, असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. मुख्यमंत्रंाr शिंदेही रालोआच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रालोआचा विस्तार होणार आहे.
दोन्ही बैठकांसंबंधी उत्सुकता
ड राजधानी दिल्ली आणि बेंगळूर येथील बैठकांसंबंधी लोकांमध्ये उत्सुकता
ड रालोआचा विस्तार करण्याची भाजपची योजना, नेत्यांना लेखी आमंत्रण
ड विरोधी पक्षांचा संयुक्त नेता कोण, याचे उत्तर बेंगळूरमध्ये मिळणे शक्य
ड दोन्ही बैठकांसाठी जोरदार सज्जता, राजकारणाची दिशा स्पष्ट दिसणार









