बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात गेल्या काही दिवसात बऱ्याच अजब घटना घडल्यामुळे त्यांची परिसरात चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका गावात मगरीने माणसाला जिवंत गिळल्याची घटना घडली होती. तसेच काही आणखी काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या वनभागात काही नवे पशू आणि पक्षी दृष्टीस पडले होते. हे पशुपक्षी नामशेष झाल्याची चर्चा होती. तथापि, ते दिसून आल्याने वन्यजीवप्रेमींनी समाधात व्यक्त केले होते. आता याच जिल्ह्याच्या मधुबनी पंचायत प्रभागातील एका घरात एकाचवेळी 24 विषारी नागसाप आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हे घर स्थानिक नागरीक मदन चौधरी यांचे आहे.

ते या घरात कुटुंबासह रहात होते. त्यांच्या अडगळीच्या खोलीत जिन्याखाली हे चोवीस साप आढळून आले. तसेच नागसापाची 60 अंडीही दिसून आली. विषारी सापांचे एक मोठे कुटुंबच जणू चौधरी यांच्या कुटुंबासह येथे रहात होते. तथापि, चौधरी कुटुंबापैकी कोणालाही याची कल्पना आली नाही. कारण त्यांचे या अडगळीच्या खोलीत फारसे येणेजाणे नव्हते. पण काही दिवसांपूर्वी काही कारणास्तव त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि ते अक्षरश: भयभीत झाले.
ही घटना समजताच काही लोकांनी सर्पमित्रांना ही माहिती दिली. काही सर्पमित्रांनी एक एक करुन या सर्व सापांना बाहेर काढले. सापांची अंडीही त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली. नंतर कोणताही साप न मारता त्यांना नजीकच्या घनदाट भागात सोडून देण्यात आले. मदन चौधरी यांचे कुटुंबिय या घटनेमुळे अद्यापही भीतीच्या छायेतच वावरत आहेत. तर परिसरातील लोक सर्पमित्रांचे कौतुक करीत आहेत. नागसाप ही प्रजाती नामशेष म्हणून घोषित करण्यात आलेली नसली, तर या प्रजातीची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे नागांना संरक्षण देण्यात आले असून त्यांना मारणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे.









