ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथे राहत्या घरी शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला. महाजनी यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.
महाजनी हे मागील 7-8 महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटीत भाडय़ाच्या घरात एकटेच राहत होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी महाजनी यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महाजनींच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे महाजनी यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले.








