बेळगाव-बागलकोट रस्त्याचे सांबरापर्यंत होतेय रुंदीकरण : पावसाळ्यानंतर कामाला येणार गती
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-बागलकोट रस्ता सांबरा गावापर्यंत सहापदरीकरण होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पुलांची रुंदीही वाढविण्यात येत आहे. बळ्ळारी नाल्यावरील पुलाची रुंदी वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र आता पावसामुळे हे काम बंद ठेवण्यात आले आहे. आता हे काम पावसाळ्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे.
बळ्ळारी नाल्यावरील पुलाची रुंदी वाढविण्यात येत असली तरी त्यामधील गाळ काढणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. बळ्ळारी नाला गाळाने भरला आहे. रुंदीकरणामुळे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होईल, असे मत व्यक्त होत आहे. सध्या या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील झाडे तोडली आहेत. त्याचबरोबर खडी टाकून रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम सुरू झाले आहे.
बळ्ळारी नाल्यावरील पुलाचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. नाल्यामध्ये कॉलमची उभारणी करण्यात आली तरी त्यावर काँक्रीट घालून रुंदी वाढविण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे अजूनही हे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे. सध्या याठिकाणी काम बंद ठेवण्यात आले आहे.