ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं, तसेच दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांनी युती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला 12 दिवस लोटले. तरीही अद्याप खातेवाटप जाहीर झाले नाही. खातेवाटपाचा तिढा लवकर सुटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या वारंवार बैठका होत आहेत. अजित पवार यांनी अर्थखातं मागितलं होतं. त्यामुळे शिंदे गटात नाराजी होती.
दरम्यान, गुरूवारी रात्री यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीतून खातेवाटपाबाबत तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांना अर्थ आणि दिलीप वळसे-पाटील यांना सहकार खातं देण्यात येणार असून, येत्या एक ते दोन दिवसांत मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.








