वृत्तसंस्था /बँकॉक
येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुरुवारी दुसऱ्या दिवशी भारतीय अॅथलिट्सनी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या 100 मी. अडथळा शर्यतीत ज्योती येर्राजीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचप्रमाणे पुरुषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत अजयकुमार सरोजने सुवर्णपदक घेतले. पुरुषांच्या तिहेरी उडीत या प्रकारात अब्दुल्ला अबुबाकरने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या 100 मी. अडथळा शर्यतीमध्ये भारताच्या ज्योती येर्राजीने 12.92 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकावले. ज्योती येर्राजीने गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत या क्रीडा प्रकारात 12.82 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
पुरुषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत 26 वर्षीय अजयकुमार सरोजने 3 मिनिटे, 41.51 सेकंदाचा अवधीत घेत सुवर्णपदक मिळवले. अजकुमारला सरोजला अमेरिकेमध्ये गेल्या मे महिन्यात खास प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्याने 2017 च्या भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर 2019 साली डोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये अब्दुल्ला अबुबाकरने 16.92 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या क्रीडाप्रकारात जपानच्या हिकारूने रौप्यपदक तर कोरियाच्या किमने कास्यपदक मिळवले. या स्पर्धेत बुधवारी भारताच्या अभिषेक पालने पुरुषांच्या 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक मिळवून पदकतक्त्यात आपल्या देशाचे खाते उघडले होते. महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या ऐश्वर्या मिश्राने 53.07 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक घेतले.









