संरक्षण विभागाचा निर्णय, संरक्षण व्यवस्था भक्कम करण्याला प्राधान्य : फ्रान्सकडून तंत्रज्ञान हस्तांतरणाचीही शक्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमाने आणि 3 स्कॉर्पियन पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण विभागाच्या खरेदी समितीने संमती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी नंतर दिली. राजनाथसिंग हेच या खरेदी समितीचे अध्यक्ष आहेत. फ्रान्सकडून भारताच्या नौदलासाठी आणखी 26 राफेल विमाने घेण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता. त्याचप्रमाणे नौदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी स्कॉर्पियन श्रेणीतील आणखी 3 पाणबुड्याही फ्रान्सकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. या दोन्ही प्रस्तावांना समितीने संमती दिल्याने यासंबंधीचे महत्वाचे करार पंतप्रधान मोदींच्या गुरुवारपासून सुरु झालेल्या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे.
चार प्रशिक्षण विमाने
भारताने फ्रान्सच्या देसाँ कंपनीकडून यापूर्वी 36 राफेल विमाने खरेदी केली आहेत. आताची खरेदी राफेल एम या प्रकारच्या विमानांची होणार आहे. ही विमाने राफेल विमानांची नौदल आवृत्ती म्हणून ओळखली जातात. ती समुद्रातील युद्धासाठी अत्यंत उपयोगी आणि प्रभावी आहेत. शत्रूच्या पाणबुड्या शोधून त्या नष्ट करणे, शत्रूच्या युद्धनौकांवर हल्ला करुन त्या निकामी करणे, तसेच शत्रूच्या विमानांना नष्ट करणे आदी कामांसाठी ही विमाने सक्षम आहेत. ही विमाने विमानवाहू नौकांवर उतरु शकतात किंवा अशा नौकांवरुन उ•ाण करु शकतात. या 26 विमानांपैकी चार विमाने प्रशिक्षणासाठी घेण्यात येणार आहेत.
तीन वर्षांनी मिळण्यास प्रारंभ
ही विमाने करार झाल्यापासून 3 वर्षांनी मिळण्यास प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात प्राथमिक करार केला जाण्याची शक्यता आहे. मात्र कराराला अंतिम स्वरुप आगामी एक वर्षात दिले जाणार आहे. या विमानांवरचा शस्त्रसंभार, अतिरिक्त सुविधा, सुटे भाग आणि विमानांची किंमत यावर सविस्तर चर्चा करुन अंतिम करार करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
विमानांमध्ये काय असणार ?
या विमानांमध्ये दूरसंचार उपकरणे, पूरक उपकरणे, शस्त्रे, अस्त्रे, सिम्युलेटर, महत्वाचे सुटे भाग, विमानांची कागदपत्रे, चालकांचे प्रशिक्षण आणि साहाय्यक आधार आदी सुविधा मिळणार आहेत. हा करार भारत आणि फ्रान्स या दोन सरकारांमध्ये थेट होणार आहे. विमानांची क्षमता आणि किंमत यांच्यासंबंधातही दोन्ही सरकारांचे प्रतिनिधी थेट चर्चा करतील, अशी माहिती देण्यात आली.
स्कॉर्पियनसंबंधी प्रस्ताव
भारत आणखी तीन स्कॉर्पियन पाणबुड्या फ्रान्सकडून घेणार आहे. यासंबंधी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात चर्चा होणार आहे. त्याआधी खरेदी समितीने हा प्रस्ताव मान्य केला आहे. अशा प्रकारच्या पाच पाणबुड्या यापूर्वीच भारताच्या नौदलात सेवेत आहेत. हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात चीनचा वाढता वावर लक्षात घेऊन या पाणबुड्यांची खरेदी होत आहे. सहाव्या अशा पाणबुडीची रचना केली जात असून ती 2024 च्या अखेरीस नौदलात समाविष्ट होणार आहे.
किंमत कशी ठरणार ?
या विमानांची किंमत त्यांची क्षमता, आक्रमण आणि संरक्षण सुविधा, त्यावरील शस्त्रसंभार, विमानांचा वेग, त्यावरील रडार यंत्रणा, दूरसंचार यंत्रणा तसेच इतर देशांनी त्यांच्यासाठी दिलेली किंमत आदी सर्व बाबींचा विचार करुन निर्धारित केली जाणार आहे. तसेच, भविष्यकाळता भारतात निर्माण झालेली क्षेपणास्त्रे आणिस शस्त्रेही या विमानांवर आरुढ केलीं जाऊ शकतील, अशी सुविधा या विमानांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे भारताला शस्त्रांसाठी ऐनवेळी फ्रान्सवर अवलंबून रहावे लागणार नाही, अशी सोय केली जाणार आहे.









