सध्या धबधब्यांवर जाण्यास सर्वांना बंदी ; चहा, नाश्ता पुरविणाऱ्यांना बंदी नाही,वनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
पणजी : वनखात्याच्या अखत्यारित येणारे राज्यातील काही ठिकाणचे धबधबे पर्यटनासाठी धोकादायक आहेत. तरीही बरेच पर्यटक तसेच स्थानिक लोक दारूच्या नशेत या धोकादायक ठिकाणी जातात आणि जीवघेण्या घटना घडतात. त्यामुळे आता सर्व धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्या ठिकाणी चहा, नाश्ता आदी पुरविणारे छोटे व्यवसायिक यांच्यासाठी ही बंदी लागू होणार नाही. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. काल बुधवारी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोकादायक धबधब्यांबाबत चर्चा करण्यात आली. काही पर्यटक तसेच स्थानिक लोक मद्यपान करुन धबधब्यांच्या ठिकाणी जातात. सध्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने आणि धबधब्यांच्या ठिकाणच्या पाण्याची पातळी किती आहे, किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने बुडून मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे राणे म्हणाले. गेल्या एक ते दीड महिन्यांत धबधबे, नद्या, किनारे, चिरेखाणी व अन्य ठिकाणी 15 ते 20 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, धबधब्याच्या ठिकाणी जाणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दोन दिवसांत येणार अहवाल
समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी धबधब्याच्या ठिकाणी बुडून मृत्यू झालेल्या घटनांसाठी वनखाते जबाबदार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले. यावर वनमंत्री राणे यांनी वनखात्याकडून अहवाल मागितला असल्याचे सांगितले. राज्यातील धोकादायक धबधबे कोणते आणि ते पर्यटनासाठी योग्य आहेत की नाहीत, याबाबतचा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक राजीव गुप्ता व मुख्य वन संरक्षक सौरभ कुमार यांच्याकडे मागितला असून तो दोन दिवसांत येणार आहे.
‘दृष्टी’ जीवरक्षकांची मदत घेणार
सांगे, काणकोण, सत्तरी या तालुक्यांत वनखात्याच्या अखत्यारित मोठे धबधबे आहेत. या धबधब्यांवर शुल्क आकारले जाते. परंतु यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आता ‘दृष्टी’ च्या जीव रक्षकांना धबधब्याच्या ठिकाणी तैनात करण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली.









