सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास : ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
खानापूर : मणतुर्गा येथे घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण पाच लाखाचा ऐवज लंपास केला आहे. खानापूर तालुक्यात पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ग्रामीण भागात घरफोड्या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथील अल्बर्ट मोनू सोज हे बुधवारी सकाळी घरातील काम आटोपून आपल्या पत्नीसह घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून संध्याकाळी सहा वाजता घरी परतले. त्यावेळी घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून भयभीत झाले. त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. घरातील दोन तिजोरी कपाट फोडून चोरट्यांनी आठ तोळे सोने, तेरा तोळे चांदी, सहा हजार रुपये असा अंदाजे पाच लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
अल्बर्ट सोज हे आपल्या पत्नीसह दोघेच घरी राहतात. सदर घर मणतुर्गा-असोगा रस्त्यावरील शेवटचे घर आहे. त्यांची दोन्ही मुले पुण्यात व्यवसायानिमित्त स्थायिक असल्याने घरी पती-पत्नी दोघेच राहतात. सकाळी घरातील कामे आटोपून कुलूप लावून शेतावर कामासाठी गेले होते. सायंकाळी सहा वाजता चोरीचा प्रकार समजला. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र याबाबत कोणतीही फिर्याद घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. जर तुमच्या सून आणि मुले पुण्यात असतील तर त्यांना बोलून घ्या, त्यानंतर फिर्याद नोंद करून घेऊ असा सज्जड दम दिल्याने अल्बर्ट सोज यांनी आपल्या सुनेला तसे कळविले आहे. सून-मुलगा खानापूरला आल्यानंतर पोलिसांशी चर्चा करून या गुह्याविरोधात तक्रार देण्यात येणार आहे. खानापूर तालुक्यात गेल्या वर्षी सातत्याने याच पद्धतीने चोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. मात्र अद्याप एकाही चोरीचा तपास खानापूर पोलिसांकडून झाला नाही. तसेच अनेक चोरीच्या प्रकरणात खानापूर पोलिसांनी फिर्याद नोंद करून घेण्यास नकार दिल्याने पोलिसांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गावोगावी सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. तालुक्यात बाहेरील चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.









