मंगळवारच्या सर्व्हरडाऊनमुळे बुधवारच्या कामकाजावर काहीसा परिणाम
बेळगाव : शिक्षक बदलीसाठी घेण्यात आलेल्या कौन्सिलिंगच्या पहिल्याच दिवशी सर्व्हरडाऊनमुळे प्रक्रिया संथगतीने सुरू होती. त्यामुळे बुधवारी दुसऱ्या दिवशी शिक्षकांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी कौन्सिलिंग न झालेल्या शिक्षकांना बुधवारी बोलाविण्यात आल्याने बी. के. मॉडेल शाळेच्या पटांगणावर जिल्ह्यातील शिक्षकांची गर्दी झाली होती. मागील वर्षभरापासून रखडलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेला मंगळवार दि. 11 पासून प्रारंभ झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षकांना जागा रिक्त असतील त्याठिकाणी बदली दिली जात आहे. पहिल्याच दिवशी सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे ही प्रक्रिया संथगतीने सुरू होती. यामुळे पहिल्या दिवशीचे वेळापत्रक कोलमडले. रात्री 8.30 पर्यंत शिक्षक कौन्सिलिंगची प्रक्रिया पूर्ण करीत होते. अखेर बेंगळूर येथून सर्व्हर बंद करण्यात आल्याने प्रक्रिया थांबवावी लागली. उर्वरित शिक्षकांना बुधवारी पुन्हा बोलाविण्यात आले. प्राथमिक विभागाचे कौन्सिलिंग झाल्यानंतर गुरुवारपासून माध्यमिक विभागाचे कौन्सिलिंग होणार असल्याने बुधवारी रात्रीपर्यंत कौन्सिलिंगची प्रक्रिया सुरू होती. पहिल्या दिवशी केवळ 300 शिक्षकांचे कौन्सिलिंग झाल्याने बुधवारी हजार ते बाराशे शिक्षकांचे कौन्सिलिंग पूर्ण करावे लागले. जिल्हाशिक्षणाधिकारी त्याचबरोबर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी याठिकाणी ठाण मांडून होते.
बी. के. मॉडेल शाळेमध्ये गर्दी
दरवेळी क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात बदलीसाठीचे कौन्सिलिंग घेतले जात होते. परंतु, यावेळी प्रथमच बी. के. मॉडेल शाळेमध्ये कौन्सिलिंग घेण्यात आले. बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची संख्या मोठी असल्याने मोठ्या जागेमध्ये कौन्सिलिंग घेतले जात असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. शिक्षकांसोबत त्यांचे कुटुंबीयही आल्याने बी. के. मॉडेल परिसरात बरीच गर्दी झाली होती.









