मे महिन्यात 9 हजार प्रवाशांचा प्रवास
बेळगाव : विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच बेळगाव विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या जाहीर केली आहे. मे महिन्यात एकूण 23,596 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. यामध्ये सर्वाधिक पसंती बेंगळूर शहराला दिसून आली आहे. दररोज दोन विमानफेऱ्या बेंगळूर शहराला असल्यामुळे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेळगाव विमानतळावरून बेंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, इंदौर, सुरत, मुंबई, तिरुपती, नागपूर, जोधपूर व जयपूर या शहरांना विमानसेवा दिली जाते. एप्रिल महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात प्रवासी संख्या वाढली आहे. विमानफेऱ्या कमी झाल्या असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद मात्र उत्तम आहे. विमान प्रवासाबरोबरच कार्गो वाहतुकीतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. मे महिन्यात शाळा, कॉलेजना सुट्या असल्यामुळे प्रवासी संख्या वाढली होती. बेंगळूर ही कर्नाटकची राजधानी असल्यामुळे प्रशासकीय कामकाजाबरोबरच इतर व्यवसायासाठी ये-जा करावी लागते. त्यामुळेच बेळगाव-बेंगळूर मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक दिसून येते. यापाठोपाठ हैदराबाद, अहमदाबाद व मुंबई शहरांनाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे.
मुंबई प्रवाशांची संख्या घटली
मुंबई-बेळगाव-मुंबई अशी विमानफेरी स्पाईस जेट कंपनीकडून दररोज सुरू होती. या विमानफेरीमुळे बेळगावसह कोल्हापूरचेही प्रवासी ये-जा करीत होते. परंतु कंपनीने ही विमानफेरी बंद केल्याने प्रवासी संख्या घटल्याचे दिसून येत आहे. सध्या स्टार एअर मुंबई मार्गावर आठवड्यातून निवडक दिवस सेवा देत असली तरी प्रवासी संख्या मात्र घटत असल्याचे दिसून येत आहे.









