अनेक वर्षांपासून एकाच ग्राम पंचायतमध्ये तळ ठोकल्याने नाराजी : बदली करण्याकडे साफ दुर्लक्ष : भ्रष्टाचाराला ऊत
बेळगाव : ग्राम पंचायत म्हणजे हुद्दा कमी आणि गोंधळ अधिक, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्राम पंचायतमध्ये साध्या शिपायापासून ते पीडीओपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा कारभार अनेकांना लाजविणारा ठरला आहे. काही ग्राम पंचायतमधील सेक्रेटरी, लेखा साहाय्यक अधिकारी व क्लार्कनी बक्कळ माया जमविल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा कर्मचाऱ्यांपासून त्रास होणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या बदलीची मागणी केली. तरी त्यांच्या बदली होत नाहीत. तब्बल 10 ते 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकणाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्राम पंचायतीचा कारभार दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. तेथे अनेक अनधिकृत प्रकार सुरू असतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असे म्हणण्यापेक्षा आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सारेच काही अलबेल सुरू आहे. अनेक वर्षांपासून तळ ठोकून असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रष्टाचारात भर पडत आहे. दरम्यान 10 ते 15 वर्षे झाली तरी त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यामुळे त्यांचे फावत चालले असून अनेक नागरिकांना त्रासदायक होत आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
निवेदन-आंदोलनाकडे दुर्लक्ष
बेळगाव तालुका पंचायत कार्यक्षेत्रात 58 ग्राम पंचायती येतात. येथील कारभार सुधारण्यासाठी अनेकदा निवेदने व आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक पीडीओंचाच कारभार संशयाच्या भोवऱ्यात असतो. हा सारा प्रकार घडत असतानाही अधिकाऱ्यांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पीडीओ, लेखा साहाय्यक अधिकारी, सेक्रेटरी यांची तीन वर्षांतून एकदा बदली होणे गरजेचे असते. मात्र कायमस्वरुपी त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्याने समस्या निर्माण होत आहेत.
पीडीओंपेक्षा सेक्रेटरी-कनिष्ठ अधिकारीच वरचढ
मलई खायची असेल तर कनिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करून त्यांची बिले ताबडतोब अदा करा, असे सांगतात. कारण टक्केवारीची मलई खाण्यासाठीच त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू असतात. दरम्यान यामध्ये स्थायिक झालेल्या काही पीडीओ अधिकाऱ्यांची वरकमाई मोठ्या प्रमाणात होत असते. हा सारा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला तरी त्यांची बदली करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अशा पीडीओ व संबंधित कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फावत आहे. परिणामी अनेक ग्राम पंचायतींमध्ये आता पीडीओंपेक्षा सेक्रेटरी व त्यांचे कनिष्ठ अधिकारीच सर्व काही आपल्यावरच चालते, अशा आविर्भावात आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे.
गैरकारभारात सदस्यांचाही सहभाग
अनेक पीडीओं, लेखा साहाय्यक अधिकारी, सेक्रेटरी पैशाशिवाय कामे करत नसल्याच्या तक्रारी ग्राम पंचायत सदस्यांकडे करण्यात येतात. मात्र सदस्यही त्यामध्ये सामील असल्याने त्यांची बदली करण्याकडे तेही दुर्लक्ष करत असतात. याबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने ग्राम पंचायत अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
राज्य सरकारचे बदली न करण्याचे आदेश
ग्राम पंचायतमध्ये मागील अनेक वर्षांपासून काही पीडीओ, सेव्रेटरी व लेखा साहाय्यक अधिकारी ठाण मांडून आहेत. याबाबतची माहिती आपल्याला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक ग्राम पंचायतमधील पीडीओबरोबरच इतरांची बदली करण्यासाठीचे सर्व कागदपत्रे तयार केली होती. मात्र याबाबत आता राज्य सरकारने बदली न करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे सध्या तरी सरकारकडून आदेश येईपर्यंत कोणाची बदली करणे चुकीचे ठरणार आहे. तरीही ज्या पीडीओं किंवा संबंधितांच्या तक्रारी वाढल्या तर त्यांची बदली करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
-हर्षल भोयर (जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी)









