विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी यांना निवेदन : अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा
बेळगाव : मागील सहा महिन्यांपासून अलतगा गावाला एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. परिणामी याचा फटका ग्रामस्थ व प्रवाशांना बसत आहे. बेळगाव सीबीटी ते व्हाया अलतगा हंदिगनूर बससेवा अचानकपणे बंद करण्यात आली आहे. याचा नाहक त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे अलतगा गावाला पूर्ववत बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन परिवहनचे विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी यांना देण्यात आले. येथील बससेवा बंद असल्याने कंग्राळी खुर्द, अलतगा ज्योतीनगर परिसरातील शेकडो विद्यार्थी, कामगार, भाजी विव्रेते यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याबरोबर अलतगा येथील लोकांना जवळपास 1 ते 1. 50 किलोमीटर पावसाळा, उन्हाळा पायपीट करावा लागत आहे. त्यामुळे अलतगा गावाला कायमस्वरूपी बससेवा सुरळीत केल्यास अनेकांची गैरसोय दूर होणार आहे. दरम्यान रात्री वसतीची बस नसल्याने महिलावर्गाची गैरसोय होत असून, रात्री वसतीची बसही कायम करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
बस सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
जवळपास 50 ते 60 विद्यार्थी बस स्थानकावर बसची वाट बघत होते. तेथून जा असताना कोणतीही बस थांबवत नसल्याचे पाहून कंग्राळी ग्राम पंचायत अध्यक्षांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बससेवा सुरळीत करण्यासाठी विनंती केली. त्यावेळी चार दिवसात स्वतंत्र बसची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. दरम्यान ही बससेवा सुरळीत न केल्यास मोठे आंदोलन छेडू, असा इशाराही देण्यात आला आहे.
बस नसल्याने वडाप-अन्य वाहनांचा आधार
सध्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत प्रवास सुरू केला आहे. मात्र याचा फायदा अलतगा कंग्राळी व ज्योतीनगर येथील महिलांना होताना दिसत नाही. ज्या बसेस येतात त्या खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे या ठिकाणी बस थांबवत नसल्याने अनेकांना वडाप व इतर वाहनांच्या साहाय्याने बेळगाव गाठावे लागत आहे. याची माहिती यापूर्वी परिवहन मंडळाला देण्यात आली. मात्र त्याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता तरी बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मलगौडा पाटील यांनीही अलतग्याला बस कायम करण्याची विनंती केली आहे. राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापक अनंत शिरगुपकर व विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले व बससेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य चेतक कांबळे, प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर, चेतन हिरेमठ आदी उपस्थित होते.









