युवा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यात यावे, चिकोडी-हिरेकुडी येथील जैनमुनींची झालेली हत्या, तसेच म्हैसूर-टी नरसिपूर येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे, अशा मागणीचे निवेदन युवा ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसिपूर येथे दि. 8 जुलै रोजी वेणूगोपाल नामक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना ताजी असताना तीन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील कामकुमार जैनस्वामींची आर्थिक व्यवहारातून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. दोन्ही घटना समाजाला मारक ठरणाऱ्या आहेत. यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने त्वरित याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्या वाढत आहेत. सरकारने त्वरित योग्य उपाययोजना राबवाव्यात. हत्येखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते बी. एस. चिक्कमठ, राहूल वाघमारे, व्ही. बी. विजापूर, डी. एस. परीट आदी उपस्थित होते.









