वार्ताहर /मच्छे
उद्यमबाग परिसरात पूर्व-पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले असून दोन्ही बाजूला पेव्हर्स घालण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जवळजवळ पाच सहा महिने सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याला सुरुवात झाली होती. मात्र गेल्या एक दीड महिन्यापासून तयार झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हर्स घालण्याचे काम बंद होते. त्यामुळे साहजिकच उद्योजक आणि कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तसेच बहुतांश मशीन शॉप व फाउंड्रीकरिता कच्चामाल वाहतूक करणारे वाहन अडकण्याचे प्रकार घडत होते. मालाची ने-आण करण्यात मोठी अडचण झाली होती. त्यामुळे साहजिकच विक्री उत्पादनावर याचा परिणाम झाला होता. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाला. मात्र दोन्ही बाजूला पेव्हर्स-घालण्याचे काम रेंगाळले होते. गेल्या आठवड्यापासून कामाला सुरुवात झाली आहे. बहुतांश ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे. काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी रस्ता वाहतुकीस खुला झाल्यामुळे उद्योजक व कामगारांतून समाधान व्यक्त होत आहे.









