अजित पवार दिल्लीला रवाना: मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दरबारी
प्रतिनिधी/ मुंबई
कानामागून आला आणि तिखट झाला, अशा पद्धतीने सन 2014 पासून भाजपला हुलकावणी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्षभरानंतर दाखल होऊनही महत्त्वाची मंत्रिपदे देण्याला शिंदे गटाचा सक्त विरोध आहे. शिंदे गट ऐकत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे आणि शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनाही बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागत आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्ताराचा आणि खातेवाटपाचा तिढा सुटत नसल्यानेच आता दिल्लीत खलबते होणार आहेत. अजित पवार यांच्या गटाच्या समावेशाने राज्य सरकार अधिक मजबूत झाले. डबल इंजिनचे ट्रिपल इंजिन सरकार झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. मात्र त्याचवेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणींची जाणीव असावी. कारण उपमुख्यमंत्रीपदासह 9 मंत्रीपदे देऊन अजित पवार गटाचा सरकारमध्ये समावेश करण्यात आला होता.
अर्थखात्यासह रायगडचे पालमंत्रीपदही वादात
शिंदे गटातील आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असतानाच अजित पवार गटातील 9 आमदारांनी सरकारमध्ये सामील होताच पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गट व भाजपातील इच्छुक नाराज आहेत. त्यातच नव्याने सरकारमध्ये आलेल्या अजित पवार गटाला कोणती खाती द्यावीत, यावरही खलबते चालू आहेत. अजित पवारांना अर्थखाते देण्यावरून तसेच इतर दोन महत्त्वाच्या खात्यांवरून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अडले आहे. त्यातच रायगडच्या पालकमंत्रीपदाचीही भर पडली आहे. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यास शिंदे गटाचा विरोध आहे. त्यासाठी भरत गोगावले आग्रही आहेत.
अजित पवारांमुळे शिंदे गटाची कोंडी
महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या (अर्थखाते) होत्या. त्यावेळी अजित पवार निधीवाटपात भेदभाव करतात, असे काँग्रेसच्या आमदारांचे म्हणणे होते. पण अजित पवार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त निधी देत असून शिवसेनेला संपवण्याचे काम चालू असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये नको, अशी ठाम भूमिका शिंदे गटाच्या आमदारांनी त्यावेळी घेतली होती. आता तेच अजित पवार राष्ट्रवादी पक्ष बरोबर घेऊन सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे.
…तर शिंदे गटाची नाचक्की
सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते आहे. सत्तेत अर्थखाते महत्त्वाचे मानले जाते. आता पूर्वीप्रमाणेच अजित पवार यांच्याकडेच पुन्हा अर्थखाते जाण्याची शक्यता आहे. मात्र अजित पवारांना अर्थखाते देण्याला शिंदे गटाचा विरोध असल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप करत शिंदे गटाने शिवसेनेत बंड केले होते. त्याच अजित पवार यांना आता अर्थखाते दिल्यास शिंदे गटाच्या आमदारांची राजकीय वर्तुळात नाचक्की होणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी यावर सावध भूमिका घेतली आहे.
शिंदेचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा
खातेवाटपात शिवसेनेच्या सर्व आमदारांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदेंवर आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो सर्वांच्या हिताचा असेल याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्ही कुणाला कोणते खाते द्यावे, याची चर्चाही करत नाही, असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.
तिढा नाही
मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार दिल्लीला गेलेले नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुद्दा काही तिढा नाही. तसेच याबाबतचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाणारा आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आम्ही कधीच आग्रही नव्हतो. शेवटी ज्यावेळी एकत्रित काम करण्याचे ठरलेले असते तेव्हा त्याबाबतची जाणीव मनात ठेवून काम करणे महत्त्वाचे असते. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर घेतील, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले आव्हाड?
अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर दहा जिवस झाले तरी त्यांनी खाते मिळालेले नाही. अखेर अजित पवार यांना दिल्लीत धाव घ्यावी लागली. तोच मुद्दा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्यात राजासारखी राहणारी व्यक्ती दिल्लीला सुभेदार होण्यासाठी जात असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.









