प्राध्यापकाचा हात कापल्याप्रकरणी एनआयए न्यायालयाचा निर्णय : आज शिक्षा सुनावणार
वृत्तसंस्था~ तिअनंतपुरम
केरळच्या एनआयए न्यायालयाने बुधवारी 2010 मध्ये एका प्राध्यापकाचा हात कापल्याप्रकरणी सहा जणांना दोषी ठरवले. हे सर्व आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेचे सदस्य आहेत. प्रोफेसर जोसेफ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने 11 पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या दोषींच्या शिक्षेची घोषणा 13 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
इडुक्की जिह्यातील थोडुपुझा येथे 4 जुलै 2010 रोजी न्यूमन कॉलेजचे प्रोफेसर टी. जे. जोसेफ यांचा उजवा हात कापला गेला होता. एर्नाकुलम जिह्यातील मुवट्टुपुझा येथील चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनासभेला उपस्थित राहून ते कुटुंबासह घरी परतत असताना प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणाचा सुऊवातीला तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यूमन कॉलेजमध्ये बीकॉम सेमिस्टर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत अपमानास्पद धार्मिक शेरेबाजी केल्याप्रकरणी प्राध्यापक जोसेफ पीआयएफच्या निशाण्यावर होते.
प्रोफेसर जोसेफ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने 11 पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 2010 मध्ये घडलेल्या या प्रकरणात सुरुवातीला 31 जणांवर संशय व्यक्त केला जात होता. खटल्याच्या पहिल्या टप्प्यात 31 आरोपींना सुनावणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर केवळ 11 जणांवर गुन्हा निश्चित करण्यात आला. या प्रकरणात न्यायाधीश अनिल भास्कर यांनी दोषींवर निकाल दिला. न्यायाधीशांनी सर्व आरोपींना भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, कट रचणे आणि इतर अनेक गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. काही आरोपींना कठोर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्ह्यांसाठी देखील दोषी ठरविले आहे. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
न्यायालयाने एप्रिल 2015 मध्ये यातील 10 आरोपींना स्फोटक पदार्थ कायदा आणि आयपीसी अंतर्गत दोषी ठरवले होते. त्याचवेळी गुन्हेगारांना आश्र्रय दिल्याप्रकरणी आणखी तिघे दोषी आढळले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील अन्य 18 जणांची निर्दोष मुक्तता केली होती.









