सध्या हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला आहे. प्रचंड पूर आलेले आहेत आणि अनेकांचे बळी त्यात गेले आहेत. गावेच्या गावे उध्वस्त झाली असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशा स्थितीत कोणाला आपला विवाह करायचे नुसते सुचणेही अशक्य आहे. पण सिमला जिल्ह्यातील मंगसू या गावातील अशीष सिंघा आणि कुल्लूतील भुंतर गावातील शिवानी ठाकूर यांनी 10 जुलैला विवाह केला. हा विवाह त्यांनी ऑनलाईन केला कारण सध्या तेथे घरातून बाहेर पडण्यासारखी स्थिती नाही. वास्तविक त्यांचे लग्न आधी ठरलेले होते. पण अतिवृष्टीमुळे ते समारंभपूर्वक करता येणे त्यांना अशक्य झाले होते.

म्हणून त्यांनी ऑनलाईनचा आधार घेतला. दोघांच्याही पुरोहितांनी विवाहाचे सर्व सोपस्कार रितसर आणि परंपरेनुसार पण ऑनलाईन केले. मुहूर्तावर विवाह लावण्यात आला. पावसामुळे दोन्ही परिवार त्यांच्या त्यांच्या घरीच राहिले. त्यामुळे आता केवळ वधूची पाठवणी आणि तिचा गृहप्रवेश तेवढा राहिला आहे. तो पाऊस आणि दरडी कोसळण्याचे थांबल्यानंतर करण्यात येणार आहे.









