पुणे / प्रतिनिधी :
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात काही ठिकाणी पाऊस बरसल्यानंतरही महाराष्ट्र राज्य अद्यापही तहानलेलेच असून, 1 जून ते 11 जुलैच्या कालावधीत सरासरीच्या उणे 23 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. याबरोबरच राज्यातील 20 जिल्हे अवर्षणग्रस्त असून, 4 जिल्हे दुष्काळसदृश स्थितीत पोहोचल्याचे दिसत आहे. धरणसाठय़ाची स्थितीही जैसे थेच असल्याने आता पाणीसंकट निर्माण झाले आहे.
जून महिन्यातील बहुतांश दिवस पावसाने ओढ दिली. शेवटच्या टप्प्यात तसेच जुलैच्या पहिल्या आठवडय़ात दमदार पावसाने राज्याला दिलासा मिळाला. मात्र या पावसाने ना जूनची सरासरी भरून काढली, ना जुलैची. परिणामी पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे पाणीसाठय़ात किंचित वाढ झाली असली, तरी तुलनेत जलसाठा मर्यादितच राहिल्याने पाणीसंकट उभे ठाकले आहे. जून ते 11 जुलैदरम्यान राज्यात 321 मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात मात्र 247.20 मिमी इतका पाऊस झाला असून, तो सरासरीच्या उणे 23 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील 20 जिल्हे अवर्षणग्रस्त असून, यात सरासरीच्या उणे 59 ते उणे 20 टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे.
कोल्हापूर, साताऱ्यांसह रत्नागिरीतही पावसाचे उणे
मुंबई शहर उणे 40, रत्नागिरी उणे 20, कोल्हापूर उणे 33, सातारा उणे 50, पुणे उणे 29, नगर उणे 30, सोलापूर उणे 45, उस्मानाबाद उणे 43, बीड उणे 41, औरंगाबाद उणे 31, जळगाव उणे 23, परभणी उणे 31, बुलढाणा उणे 48, वाशिम उणे 45, नांदेड उणे 35, वाशिम उणे 45, यवतमाळ उणे 33, अमरावती उणे 39, वर्धा उणे 35, चंद्रपूर उणे 39, गडचिरोली उणे 30 टक्के
4 जिल्हय़ात दुष्काळ
सांगली उणे 71, जालना उणे 62, हिंगोली उणे 83, अकोल्यात सरासरीच्या उणे 70 टक्के पाऊस झाला आहे.
पालघर, मुंबई उपनगरात चांगला पाऊस
पालघर जिल्हय़ात सरासरीच्या 35 टक्के अधिक, मुंबई उपनगरात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, रायगडमध्ये समाधानकारक पाऊस
सिंधुदुर्ग तसेच रायगड जिल्हय़ात पाऊस सरासरीच्या आसपास पोहोचला आहे. यात अनुक्रमे उणे 10, उणे 4 टक्के पाऊस झाला आहे.
पाणीसाठा 29 टक्क्यांवर
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राच्या पाणीसाठय़ातही घट झाली आहे. सध्या सर्व धरणांत मिळून 29.64 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 39.84 टक्के इतका होता.








