प्रतिनिधी/ बेळगाव
भावसार क्षत्रिय समाजाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ग्रामदैवत आषाढी देवीची यात्रा साजरी करण्यात आली. कॅम्प येथील भावसार क्षत्रिय समाजाच्या सभागृहात आषाढी देवीचे विधिवत पूजन करण्यात आले. चांगल्या प्रकारे पाऊस होऊ दे, रोगराई पसरू नये, असे साकडे देवीला घालण्यात आले. ओटी भरण्यासाठी दिवसभर महिलांची गर्दी होती.
भावसार समाजाच्यावतीने आषाढी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आषाढी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिचे विधिवत पूजन केले जाते. भावसार समाजाच्याबरोबरच इतर समाजही या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. यावर्षी हरिभाऊ व मीनाताई सरोदे यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अजित कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
पारंपरिक पद्धतीने भजन सादर करण्यात आले. यावेळी समाजाच्या पंच कमिटीचे अध्यक्ष मदन गोजे, सेक्रेटरी सिद्धू माळदकर, सदस्य प्रदीप गुर्जर यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यरात्री उशिरा जक्कीनहोंड येथे आषाढी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.









