केएमएफ 24 प्रणाली अपलोड करण्याबाबत 10 कर्मचाऱ्यांना नोटीस
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या वर्षभरापासून केएमएफ 24 प्रणाली अपलोड करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या याबाबत शहरामध्ये जनजागृती होत आहे. अजूनही याबाबत महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी गांभीर्य घेतले नाही. त्यामुळे 10 महसूल कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
महसूल विभागामध्ये एकूण 39 कर्मचारी शुल्क जमा करण्यासाठी तर 8 जण महसूल निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या सर्वच कर्मचाऱ्यांना केएमएफ 24 प्रणालीवर मालमत्तांची नोंद करण्यासाठी सूचना केली होती. मात्र वर्षभरापासून त्यांनी काम केले नाही. त्यामधील 10 जणांना ही नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा हे कर्मचारी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आहेत.
महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून अशोक दुडगुंटी रुजू झाल्यानंतर त्यांनी महापालिकेतील काम सुधारण्याकडे अधिक भर दिला आहे. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेत काम करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. जे काम करणार नाहीत त्यांना यापुढेही अशाच प्रकारे नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.