बीसीसीआयचे 500 कोटींचे बजेट : प्रत्येक स्टेडियमसाठी 50 कोटी खर्च करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी 100 दिवसापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. या स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर असे 46 दिवस चालणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 48 सामने होणार आहेत. सर्व सामने 10 ठिकाणी खेळवले जातील. हे सर्व 10 स्टेडियम वर्ल्ड क्लास बनवण्यासाठी बीसीसीआयने 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
प्रत्येक स्टेडियमला 50 कोटी रुपये मिळणार आहेत. वर्ल्डकपचे सर्व सामने हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. हैदराबादशिवाय गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवले जातील. वर्ल्डकपआधी स्टेडियममधील कॉर्पोरेट बॉक्स आणि स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. यासोबतच मैदानावर नवीन एलईडी दिवेही लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, प्रथमच भारत स्वतंत्ररित्या वर्ल्डकप आयोजित करत असल्यामुळे बीसीसीआयकडून स्पर्धेच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्टेडियममध्ये सुधारणा काय होणार
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एकूण पाच विश्वचषकातील सामने खेळवले जाणार आहेत. खेळाडूंच्या सोयीसाठी या स्टेडियममधील ड्रेसिंग रुममध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये तिकीट व्यवस्था, चाहत्यांची आसनव्यवस्था आणि स्वच्छतागृहांबाबत प्रश्न अजूनही कायम आहेत. यामुळे विश्वचषकापूर्वी या सर्व अडचणी दूर करण्यासाठी डीडीसीएला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन बीसीसीआयने दिले आहे. यंदाच्या आयपीएलचे काही सामने लखनौच्या स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. तेव्हा येथील खेळपट्टी अतिशय संथ होती. ज्यावर फलंदाजी करणे खूप कठीण दिसत होते. आता विश्वचषक पाहता या मैदानावर नवीन खेळपट्ट्या बनवण्यात येणार आहेत.
चेन्नईमध्ये दोन पिच तर धरमशालामध्येही नवी आऊटफिल्ड
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यासोबतच लाल मातीच्या दोन पिच तयार करण्याचे कामही करण्यात येणार आहे. येथील स्टेडियममध्येही 5 सामने होतील. धरमशाळेच्या सुंदर स्टेडियममध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी 6000 मीटर पाईप टाकून ड्रेनेज सिस्टीम तयार केली जात आहे. स्कॉटलंडमधील प्रयोगशाळेत तपासणी केलेली नदीतील वाळू आणि खडी आउटफिल्डवर वापरली गेली आहे. तसेच पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये वर्ल्डकपपूर्वी बहुतांश भागात छत बांधण्यात येणार आहे. तर स्वच्छ स्वच्छतागृहे, चांगले रस्ते, पार्किंगची जागा यावरही काम केले जाणार आहे. दिव्यांचीही काही कामे करावी लागणार आहेत.
अहमदाबाद, बेंगळूर आणि हैदराबाद या उर्वरित स्टेडियमनाही बीसीसीआय 50-50कोटी रुपये देणार आहे. येथे छोट्या समस्यांवर काम करून विश्वचषकासाठी हे स्टेडियम प्रेक्षणीय बनवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.
ईडन गार्डनवरील लढतींचे तिकीट दर जाहीर
कोलकाता : आयसीसी विश्वचषक स्पर्धा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. यादरम्यान, कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दुसऱ्या उपांत्य सामन्यासह एकूण पाच सामने होणार आहेत. या सामन्यांच्या तिकीटांचे दर बंगाल क्रिकेट संघटनेने मंगळवारी जाहीर केले आहेत. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या उपांत्य सामन्यासाठी प्रेक्षकांना किमान 900 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आणि उपांत्य फेरीच्या तिकिटांची किंमत 900 रुपये (अपर टायर) ते 3,000 रुपये (बी, एल ब्लॉक) दरम्यान असेल. या दोन सामन्यांच्या व्यतिरिक्त इतर तिकिटांची किंमत 1500 रुपये (डी, एच ब्लॉक) आणि 2500 रुपये (सी, के ब्लॉक) असेल. बांगलादेश आणि पहिला क्वालिफायर यांच्यातील सामन्यासाठी सर्वात कमी तिकीट 650 रुपये (अपर टायर) असेल. याशिवाय इतर तिकिटे 1000 रुपये (डी आणि एच ब्लॉक) आणि 1500 रुपये (बी, सी, के, एल ब्लॉक) असतील. दरम्यान, 1 जुलैपासून आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर ही तिकीटे उपलब्ध असणार आहेत.









