महत्त्वाच्या पदांवर अपात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप : सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभेत मंगळवारी सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा जोरदार चर्चेचा ठरला. महत्त्वाच्या पदांवर अपात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप करत विरोधी भाजप सदस्यांनी विधानसभेत ठिय्या मांडल्याने कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. विजापूर नगरपालिकेत अपात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी भूमिका भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मांडली.
यावेळी नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी विजापूर महानगर महामंडळावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला कायम ठेवणार आहे. ‘तुम्हाला वाटेल ते करा’ असे विधान केल्याने भाजपचे सदस्य संतप्त झाले. भाजपचे सरकार असतानाही आम्ही कोणत्याच अधिकाऱ्यांची बदली केली नाही. सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांसोबत काम केले. आम्ही बदलीचा कोणताही धंदा केला नाही, तुम्ही अपात्र अधिकारी नेमण्याचा व्यापार सुरू केला आहे, अशी तक्रार बसनगौडा पाटील यांनी केली.
यत्नाळ यांच्या या विधानावर तुटून पडलेल्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आम्ही व्यापार करण्यासाठी सभागृहात येत नसल्याचे स्पष्ट करताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप झाले. चूक सुधारण्याच्या भाजप सदस्यांच्या आग्रहापुढे सत्ताधारी पक्षाने माघार घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी धरणे धरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाल्याने सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले.
पुन्हा कामकाजाला सुरूवात झाल्यावर मंत्री भैरती सुरेश यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजप सदस्यांनी धरणे सुरूच ठेवले. दरम्यान, सभाध्यक्षांनी भैरती सुरेश यांनी केलेल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केल्यानंतर भाजप सदस्यांनी उपोषण मागे घेतले.
हत्याप्रकरणावरून भाजचे धरणे
चिकोडीच्या जैन मुनींचे हत्या प्रकरण सीबीआयकडे न सोपवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात भाजप सदस्यांनी विधानसभेत धरणे आंदोलन केले. जैन मुनींच्या हत्येप्रकरणी मंगळवारी विधानसभेत बोलताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी, या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची गरज नाही. जैन मुनींच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, ही भाजपची मागणी त्यांनी फेटाळून लावली.
भाजपकडून आज राज्यपालांना निवेदन
जैन मुनींच्या हत्येसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावे, या मागणीचे निवेदन बुधवारी राज्यपालांना देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. विधानसौध येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. जैन मुनींची अमानुष हत्या करण्यात आली असून हे प्रकरण सरकारने हलक्यातच घेतले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी सार्वजनिक क्षेत्रात होत आहे. आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.









