मुंबई :
टाटा समूह लवकरच विस्ट्रॉनच्या बेंगळुरू (कर्नाटक) स्थित आयफोन प्रकल्पाचे अधिग्रहण पूर्ण करेल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टाटा समूह अॅपलचा पुरवठादार विस्ट्रॉनचे कारखाने ताब्यात घेण्याच्या कराराला अंतिम रूप देण्याच्या मार्गावर आहे. ऑगस्ट 2023 च्या सुरुवातीला या करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टाटा समूह ताब्यात घेतल्यानंतर, भारताला अॅपल उत्पादनांसाठी पहिली देशांतर्गत म्हणजेच स्वदेशी उत्पादनाची संधी प्राप्त होणार आहे. प्राप्त अहवालानुसार, विस्ट्रॉनच्या कारखान्याची किंमत 600 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 4,946 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. टाटा समूह आणि विस्ट्रॉन यांच्यात या करारासाठी गेल्या एक वर्षापासून वाटाघाटी सुरू आहेत. हा विस्ट्रॉन प्रकल्प आयफोन-14 मॉडेलच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. सध्या या प्रकल्पामध्ये 10,000 पेक्षा जास्त कामगार काम करतात. विस्ट्रॉनने 2008 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला, जेव्हा कंपनीने अनेक उपकरणांसाठी दुरुस्ती सुविधा पुरवल्या. यानंतर 2017 मध्ये, कंपनीने आपल्या कार्याचा विस्तार केला.









