पुणे / वार्ताहर :
पुण्यात एचपी, सॅमसंग, कॅनन, इफसन व डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट तयार करणारे रॅकेट गुन्हे शाखा एकच्या पथकाने उध्वस्त केले.
खडक पोलिसांनी शुक्रवार पेठेतील आण्णासाहेब खैरेपथ येथे प्रविण खोड (वय 28 वर्ष, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे) यांच्या दुकानात छापा टाकला. यावेळी दुकानात सॅमसंग, कॅनन व इफसन कंपनीचे बनावट टोनर, कार्टेज, आउटर बॉक्स, पॅक इंक बॉटल, होलोग्राम यांचे बनावटीकरण केलेले पार्ट व साहित्य आढळून आले. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 25 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उप-निरीक्षक एस कुलकर्णी हे करीत आहेत.
तसेच सहा जुलै रोजी तक्रारदार यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सैय्यद व युनिट एकच्या पथकाने मिळुन तृप्ती टेडर्स, प्रेम टॉईज, गणेश टेडर्स, रविवार पेठ, पुणे येथील दुकानांवर छापा टाकला. तिन्ही दुकानांतून बनावट डिस्ने कंपनीची खेळणी व शालेय साहित्य असा 2 लाख 94 हजार रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे. त्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पो. निरीक्षक आशिष कवठेकर हे करीत आहेत.