मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : 18 कोटी खर्चाच्या पैकुळ पुलाचे उद्घाटन,दोन महिन्यांत सावर्डे पुलाचीही पायाभरणी
वाळपई ; प्रतापसिंह राणे यांच्या दूरदृष्टीमुळे सत्तरी तालुक्यामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित झाले. आता केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने गोवा सरकार शहरांबरोबरच ग्रामीण भागांच्या विकासालाही प्राधान्य देत आहे. त्यामुळे पैकुळसारख्या ग्रामीण भागामध्ये 18 कोटी खर्चून पुलाची उभारणी झाली. लवकरच सावर्डे येथे अऊंद पुलाच्या जागी नवीन प्रशस्त पुलाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी केली. गोवा राज्य पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळातर्फे गुळेली पंचायत क्षेत्रातील पैकुळ येथे उभारलेल्या पुलाच्या उद्घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सदर माहिती दिली. याप्रसंगी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्ये मतदारसंघाच्या आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देविया राणे व सत्तरी तालुक्यातील सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.
सावर्डे पुलाची पायाभरणी दोन महिन्यात
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागाच्या विकासावर गोवा सरकार विशेष लक्ष देत आहे. सर्वसामान्य घटकांना विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्याच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी योजना राबविण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागाचा विकास कधीही थांबणार नाही. विश्वजित राणे यांनी अपेक्षित धरलेली विकासकामे निश्चितच राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
अवघ्या नऊ महिन्यात उभारला पूल
रगाडा नदीवर पैकुळ येथे असलेला 35 वर्षे जुना पूल 2021 साली पुरामुळे कोसळला होता. त्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांना त्रास होत होते. ग्रामस्थांची तात्पुरती सोय म्हणून पदपूल उभारण्यात आला. त्यावेळी विश्वजित राणे यांनी या पुलाचे बांधकाम शक्य तेवढ्या लवकर हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नंतर बांधकाम सुरू करुन फक्त नऊ महिन्यांच्या काळात बांधकाम पूर्ण करण्यात आले. यामुळे या गावाच्या विकासाला आता चालना मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रतापसिंह राणे दूरदृष्टीचे नेते
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या दूरदृष्टीमुळे सत्तरी तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली. सांखळी येथे महाविद्यालयाची संकल्पना साकार केली. एसीजीएल कंपनी कार्यान्वित केली. यामुळे तालुक्याच्या विकासाला चांगली चालना मिळाली. त्यावेळची गरज ओळखून पैकुळ, सावर्डे येथे पूल उभारले. आज परिस्थिती बदललेली आहे. यामुळे 35 वर्षांनंतर पुन्हा एकदा नवीन पुलांची संकल्पना साकार करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
आरोग्य खात्याचा कारभार प्रभावी
इतर राज्याच्या तुलनेत गोव्याच्या आरोग्य खात्याचा कारभार प्रभावी आहे. गोव्यातील नागरिकांना मोफत औषधे प्राप्त होत आहेत. दर्जेदार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. येणाऱ्या काळात कॅन्सर ऊग्णांना मुंबईला न नेता गोव्यातच ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी त्यासाठी करार केलेला आहे. तरीसुद्धा ज्या ऊग्णांना परराज्यामध्ये उपचार घ्यायचे असतील त्यांच्यासाठी मेडिक्लेम योजना नव्याने जाहीर करण्यात येईल. यामुळे कोणत्याही ऊग्णाची अडचण होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आवश्यक तेथे मोबाईल टॉवर उभारणार
सत्तरीतील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क मिळत नाही. वनखात्याच्या विरोधामुळे मोबाईल टॉवर उभारणे शक्य होत नाही. त्यामुळे धोरण बदलून वनखात्याची परवानगी घेऊन ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर आवश्यक आहे त्या ठिकाणी टॉवरची उभारणी करून नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
सत्तरीतील अनेक विकासकामे मार्गी : डॉ. देविया
आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले की, मोदींच्या डबल इंजिन सरकारने सत्तरी तालुक्यातील अनेक समस्या मार्गी लावलेल्या आहेत. नानेली व जांभूळ जंक्शन या भागाचा रस्ता पूर्ण झालेला आहे. हे दोन्ही रस्ते विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. पर्ये मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. अनेक गावांमध्ये आजही मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्या संदर्भातही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनाच्या माध्यमातून आवश्यक ठिकाणी मोबाईलचे टॉवर उभारण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर अन्य मान्यवरांमध्ये गुळेली सरपंच नितेश गावडे, खोतोड्याचे सरपंच नामदेव राणे, भिंरोड्याचे सरपंच उदयसिंग राणे, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, वाळपई नगराध्यक्ष सेहझीन शेख, म्हाऊस सरपंच सरिता गावकर, विनोद शिंदे, नगरगावचे सरपंच संध्या खाडीलकर, केरी सरपंच दीक्षा गावस, होंडा पंचायत सरपंच शिवदास माडकर, सावर्डे सरपंच उज्वला गावकर, ठाणे सरपंच सरिता गावकर, जिल्हा परिषद सदस्य उमाकांत गावडे, जीएआयडीसी कार्यकारी संचालक हरिश हडकोणकर यांची उपस्थिती होती. प्राची सावंत, पंकज नाईक, सुरज नाईक, सिद्धार्थ नाईक व गुळेली सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. सूत्रसंचालन तेजस्विनी नाबर यांनी केले तर नितेश गावडे यांनी आभार मानले.
पैकुळमध्ये लवकरच सुरू होणार कदंब सेवा
पैकुळ गावाचा पूल हा फक्त एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही. या पुलामुळे आता सत्तरी तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आहे. येथे इको टुरिझमसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या गावात कदंब बससेवाही लवकरच सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
आपल्यात व विश्वजितमध्ये दुफळी नाही
मुख्यमंत्र्यांनी विश्वजित राणे व स्वत:मध्ये कोणतीही दुफळी नसल्याचेही या सोहळ्यात स्पष्ट केले. ते म्हणाले की, विरोधक विश्वजित राणे व आपल्यात दुफळी असल्याचा गैरसमज पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर जनतेने अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.









