जिल्ह्यात 11 लाख लाभार्थी : 1.40 लाख बँक खाती निष्क्रिय
बेळगाव : सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी शक्ती योजनेला सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ आता अन्नभाग्य योजनादेखील सोमवारपासून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 170 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. जिल्ह्यात 11 लाख 40 हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी 1 लाख 40 हजार लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मात्र सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी खाते प्रयत्नशील आहे. अंत्योदय आणि बीपीएल कुटुंबातील प्रमुख सदस्यांच्या खात्यावर प्रतिकिलो 34 रुपयांप्रमाणे रक्कम जमा होणार आहे. मात्र काही लाभार्थ्यांची बँक खाती बंद आहेत. तर काही बँक खात्यांना आधारकार्ड लिंक नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची चिंतादेखील वाढली आहे. मात्र याबाबतची सर्व माहिती खात्याकडे उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे यातून मार्ग काढत सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचविली जाणार आहे. या योजनेबाबत सर्वसामान्य कुटुंबीयांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. त्यामुळे खात्यावर पैसे कसे जमा होणार? असा प्रश्नदेखील लाभार्थ्यांना पडला आहे. मात्र सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचविली जाणार, असे खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जुलै महिन्यात बीपीएल कार्डधारकांना 5 किलो धान्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याप्रमाणे 170 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना रेशनच्या तांदळाबरोबरच रोख रक्कमही मिळणार आहे.
नियमित रेशन घेणाऱ्यांनाच ‘धनभाग्य’
राज्य सरकार अन्नभाग्य योजनेंतर्गत पाच किलो तांदळाऐवजी प्रतिकिलो 34 रुपये प्रमाणे प्रत्येक लाभार्थी रेशनकार्डधारकास 170 रुपये देणार आहे. लाभार्थी रेशनकार्डधारकाने हा लाभ घेण्यासाठी तीन महिन्यांतून किमान एकदा तरी रेशनचे धान्य घेतलेले असायला हवे, अशी तरतूद या योजनेत केली आहे. ज्या कुटुंबांना रेशनची गरज आहे त्यांनाच रोख रक्कम हस्तांतरित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासोबतच रेशनकार्ड प्रमुखाचे बँक खाते हे चालू स्थितीत असायला हवे. तसेच ते खाते आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध बीपीएल रेशनसंबंधी सर्व माहितीचे संकलन करून अंत्योदय कार्डधारक कुटुंबांना आणि बीपीएल रेशन कार्डधारक कुटुंबांच्या बँक खात्यावर पैसे जमा केली जाईल.
कुटुंबप्रमुखाशिवाय पैसा नाही!
बीपीएल रेशनकार्डावरील कुटुंबप्रमुखाची ओळख पटत नसल्यास कुटुंबातील इतरांनी ओखळ पटवून देणे आणि एकापेक्षा जास्त कुटुंब प्रमुख असलेल्यांनी अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे.
बँक खात्याची माहिती देण्याची गरज नाही
अन्न पुरवठा विभाग एनआयसीच्या सॉफ्टवेअरमध्ये रेशन कार्ड आणि रक्कम वर्ग करण्यासाठी पात्र लाभार्थांची यादी तयार करणार आहे. आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यांवर डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्या माध्यमातून रक्कम वर्ग होणार आहे. त्यानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून कार्डधारकाच्या बँक खात्याची माहिती संकलित केली जाते. त्यामुळे, रेशनकार्डधारकांनी खात्याला स्वतंत्रपणे बँक खात्याची माहिती देण्याची गरज नाही.









