दुरुस्तीकडे हेस्कॉम कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी
वार्ताहर /हिंडलगा
हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मण्णूर येथील शिवारात मागील आठवडाभरापासून उच्चदाबाच्या वीजवाहिन्या पडून आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदीकाठावरील शिवारात वीजखांब कोसळले असून वीजवाहिन्यांनी भू-स्पर्श केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्वरित वीजखांब दुरुस्त करण्याची मागणी हेस्कॉमकडे करण्यात आली आहे. पण, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मण्णूर गावातील माजण शिवार हा काळ्या मातीचा आहे. याठिकाणी काळी माती असल्याने जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे याठिकाणी नेहमीच वीजखांब जास्त काळ टिकत नाहीत. ते एकतर मोडकळीला येतात किंवा जमिनीकडे कलतात. वीजवाहीन्या देखील नेहमीच खाली वाकलेल्या असतात. त्यांचा पिकांना स्पर्श झाल्यास संपूर्ण पीक जळून खाक होऊ शकते. एखाद्या शेतकऱ्याचा स्पर्श झाल्यास त्याला जीवाला देखील मुकावे लागते. अशी धोकादायक अवस्था असताना देखील याकडे हेस्कॉमकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
एखाद्याचा जीव गेल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार काय?
कोसळलेल्या वीजखांबांच्या वीजतारा शिवारातील पिकात पडल्या असून, परिसरातील शेतीकामावर देखील त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. पावसाला सुरुवात झालेली असल्याने सदर शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे. पण ज्या ठिकाणी वीजतारा शेतात पडलेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकरी जाण्यास धजावत आहेत. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन देखील दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार काय? असा सवाल शेतकरीवर्गातून केला जात आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडल्यास हेस्कॉमलाच जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आला आहे.