तालुक्याच्या अनेक भागातील शिवारातील रस्त्यांचा प्रश्न बनला गंभीर : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : शिवारातील वाहतूक धोकादायक
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या विविध भागातील मुख्य व संपर्क रस्त्यांचे डांबरीकरण-कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. ही जमेची बाजू असली तरीही तालुक्याच्या विविध भागातील शेत शिवारातील रस्त्यांचा प्रश्न मात्र गंभीर बनलेला आहे. कारण बहुतांशी भागातील शिवाराकडे जाणारे रस्ते हे ख•s आणि चिखलाने व्यापलेले आहेत. त्यामुळे शेत शिवारातील वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. यामुळे प्रशासनाने शिवारातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्याच्या आधुनिक युगात शिवारातील वाहतूक सुधारित पद्धतीची होणे आवश्यक आहे. अलीकडे शेतकरीवर्ग ट्रॅक्टर व इतर शेती अवजारांचा व वाहनांचा वापर अधिक करू लागले आहेत. त्यामुळे शेतापर्यंत सदर वाहने जाणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागाच्या अनेक परिसरातील शेतांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण करायला हवे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होऊ लागली आहे. बहाद्दरवाडी गावातील खडकाकडील शिवाराकडे जाणारा रस्ता चिखलमय बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिवाराकडे जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी बहाद्दरवाडी गावच्या नाल्यापासून ते विठ्ठलाईदेवी मंदिरपर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. मात्र मंदिरापासून ते पुढील रस्ता कच्च्या स्वरूपाचा आहे. सदर रस्त्याचेही काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. शिवनगर येथून रणकुंडये रस्त्याला शेत शिवारातून रस्ता गेलेला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. तसेच वाघवडे, संतीबस्तवाड, बीजगर्णी, बेळवट्टी, राकसकोप भागातील शिवारांकडे जाणारे रस्तेही चिखलमय बनलेले आहेत.
प्रशासनाने पाहणी करून रस्ता दुरुस्त करावा- नागेंद्र गुरव, बेळगुंदी
बेळगुंदी गावातील गावडे गल्लीपासून ते मार्कंडेय नदीपर्यंत गेलेल्या गुरमाळ शिवारातील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर सुमारे गुडघाभर चिखल आहे. यामुळे शेताकडे जाणे मुश्किल बनले आहे. आजूबाजूला बेळगुंदी गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. सध्या रस्त्याची परिस्थिती पाहता चालत जाणेही अवघड बनले आहे. चिखलातून जनावरांसाठी डोकीवर गवताचा भारा घेऊन यायचा कसा? त्यामुळे प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून डांबरीकरण करावे, अशी आमची मागणी आहे.
जनावरे-बैलगाडी रस्त्यावरून शेताकडे न्यायची कशी? – नवनाथ खामकर, कर्ले
कर्ले गावाजवळील नाल्यापासून नावगे हद्दीच्या शिवाराकडे रस्ता गेलेला आहे. मात्र हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित आहे. या रस्त्यावर सध्या ख•s पडलेले आहेत. तसेच चिखलही बऱ्याच प्रमाणात आहे. कर्ले गावासह बहाद्दरवाडी, नावगे, बिजगर्णी, कावळेवाडी भागातील शेतकरी रस्त्यावरून शेतशिवाराकडे ये जा करतात. मात्र ख•sमय रस्त्यामुळे बैलगाडी तसेच जनावरे घेऊन जाताना अडचण निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याचा विकास संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी करायला हवा.
जानेवाडीतील रस्त्याची बिकट अवस्था-सातेरी पावशे , जानेवाडी
जानेवाडी गावातील शेतामधील एकही रस्ता चांगला नाही. त्यामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहेत. शिवाराकडे जायचे कसे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. गावातील प्राथमिक मराठी शाळेपासून ते खडीमशीनपर्यंत गेलेला रस्ता हा गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा आहे. प्रशासनाने या रस्त्याचे डांबरीकरण करून द्यावे, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.