वार्ताहर /किणये
हलगा गावातील मरगाईदेवी यात्रेला सोमवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारी बैलगाडीतून भंडाऱ्याची उधळण करत व पारंपरिक वाद्यांचा गजर करत गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत देवीचा जयघोष करण्यात आला. मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंगळवार दि. 11 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. तब्बल वीस वर्षांनंतर यात्रा होत असल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता ग्रामस्थ व देवस्थान पंच कमिटीच्या उपस्थितीत गावातील सर्व देवतांची पूजा आर्चा करण्यात आली. त्यानंतर देवीची ओटी भरून यात्रेला सुरुवात झाली. दुपारी मरगाई देवी मंदिरपासून वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण व पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. रात्री देवीचा गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी सकाळी 8 वाजता देवीचे हक्कदार देसाई यांच्या महावीर गल्ली येथील घरापासून वाजत गाजत मानाचा नैवेद्य आणण्यात येईल. त्यानंतर देवीला विधिवत अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे. यावेळी देवस्थान पंच कमिटीतर्फे देवीची ओटी भरून महाआरती करण्यात येणार आहे. सकाळी 11 पासून 4 वाजेपर्यंत सर्व भाविक देवीची ओटी भरणार आहेत. सायंकाळी हलगा व शगनमट्टीच्या सीमेवर जाऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.