बाइकवरून जाणाऱ्या दहशतवाद्याचा केला खात्मा : इस्लामिक स्टेटला मोठा दणका
► वृत्तसंस्था/ दमास्कस
अमेरिकेच्या एमक्यू-9 रीपर ड्रोनने सीरियात इस्लामिक स्टेटच्या म्होरक्याचा खात्मा केला आहे. हल्ल्यावेळी इस्लामिक स्टेटचा दहशतवादी बाइकवरून पलायन करत होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सीरियात एमक्यू-9 रीपरच्या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. सीरियात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मारला गेल्याचे पेंटागॉनकडून सांगण्यात आले.
तर या घटनेच्या काही तासांपूर्वी सीरियाच्या पश्चिम भागात रशियाच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या एमक्यू-9 रीपर ड्रोन्सना अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती पेंटागॉनकडून देण्यात आली आहे. अमेरिकेकडून भारत एमक्यू-9 रीपर ड्रोनची लवकरच खरेदी करणार आहे. हे ड्रोन पुढील काळात भारतीय संरक्षण दलांना प्राप्त होणार आहेत.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन उ•ाण करत असताना रशियाच्या दोन लढाऊ विमानांनी सुमारे दोन तासांपर्यंत त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले हेते. रशियाच्या विमानांनी माघार घेतल्यावर अमेरिकेच्या ड्रोन्सनी अलेप्पो भागात दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या ओसामा अल- मुहाजिरला लक्ष्य केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
हल्ल्यावेळी अल-मुहाजिर हा उत्तर-पश्चिम सीरियात होता. देशाच्या पूर्व भागातून तो स्वत:च्या कारवाया घडवून आणत होता. हल्ल्यात मारला गेलेला दहशतवादी अल-मुहाजिरच आहे का याची पुष्टी अमेरिकेच्या सैन्याने अद्याप दिलेली नाही.









