वारणानगर / प्रतिनिधी
बोरपाडळे वाठार राज्य मार्गावर कोडोली ता.पन्हाळा येथील नरसोबा मंदिराजवळ असलेल्या ओढयावरील पुलावरून आज दि. ९ रोजी रविवारी पहाटे चिऱ्याने भरलेला ट्रक ओढ्यात कोसळला .या अपघाततात दोघेजण जखमी झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साखरपा येथून विजापूरकडे हा ट्रक जात होता. रविवारी पहाटे चालकाला ओढयावरील वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक पुलाचे सुरक्षा कठडे तोडून ओढयात कोसळला. यावेळी ट्रक चालक इनामदार (रा.महमदपूर जि. विजापूर ) व त्याच्या साथीदाराच्या डोक्यास व इतरत्र दुखापत झाली. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले.
रात्रीच्या वेळी नवीन वाहन चालकास या वळणाचा अंदाज येत नसलेने ते धोकादायक आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत अपघात होत असतात. हे वळण काढण्या बाबत वाहनधारकांच्याकडून सतत मागणी होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होतात अजून किती अपघात घडत राहणार अशी नागरिकांतून चर्चा होत आहे.









