कराडमध्ये दहशतीचे वातावरण
कराड प्रतिनिधी
दरोडेखारोंच्या टोळीने दहशत माजवत कराडच्या बारा डबरी परिसरातील डॉक्टरांच्या घरावर सोमवारी पहाटे जबरी चोरी केली. डॉक्टर शिंदे यांच्या कुटूंबियांना चाकूचा धाक दाखवत रोकडसह दागिने दरोडेखोरांच्या टोळीने लंपास केले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कराडच्या बारा डबरी परिसरात शिंदे मळ्यात डॉक्टर शिंदे कुटूंबासह राहतात. त्यांच्या घराच्या परिसरात रात्री सात चोरांची टोळी वावरत होती. अंदाज घेऊन या टोळीने डॉक्टर शिंदे यांच्या घरात घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवल्याचे सांगितले जात आहे. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांच्या टोळीने शिंदे यांच्या घरातील रोकडसह दागिने पळवले. हा प्रकार डॉक्टर कुटूंबियांनी पोलिसांना कळवला. कराडचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी पाहणी केली. डिवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळाची तपासणी करत चौकशी केली. या घटनेत नेमके काय घडले असावे याची खातरजमा केली जात होती. पोलिसांनी श्वान पथकासह ठसेतज्ञांना पाचारण केले होते.









