पुरेशा पार्किंगअभावी वाहतूक कोंडी : बेशिस्त पर्यटकांवर कारवाई : सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त
आंबोली : आंबोलीत रविवारी हजारो पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे सर्वच पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाली होती. सुमारे 25 ते 30 हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज आहे. वाहनांच्या संख्येमुळे पोलीसही हतबल झाले. त्यामुळे एसटी गाड्या विलंबाने धावत होत्या. पोलीस पथके आणि नियोजन असूनही पार्किंग जागेअभावी वाहतूक कोंडी झाली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस अधिकारी, 50 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पर्यटक आणि वाहनांच्या गर्दीमुळे सकाळी साडेदहा वाजल्यापासून पोलिसांनी मुख्य धबधब्यापर्यंत जाणारी वाहने फॉरेस्ट चेकपोस्ट येथे थांबवून पर्यटकांना मिळेल त्या वाहनाने मुख्य धबधब्यापर्यंत सोडत होते. पर्यटकांच्या सोईसाठी स्थानिक तीन आसनी व मॅजिक रिक्षा माफक दरात ठेवण्यात आल्या होत्या. काही पर्यटक पायी जात होते. सकाळी साडेदहा वाजता पोलीस ठाण्याच्या बाजूची दोन्ही पार्किंग फुल्ल झाली होती. त्यानंतर चौकुळ रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येत होते. घाटात दोन्ही बाजूने वाहने लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पर्यटक आणि वाहनांची संख्या पाहता दुपारी वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे दिसत होती. त्या प्रमाणे पोलिसांनी नियोजन केले होते. परंतु वाहने आणि पर्यटकांची संख्या पार्किंगच्या जागेच्या तुलनेत जास्त असल्याने थोडीफार वाहतूक कोंडी झाली. यावर्षी पावसाळी पर्यटन उशिरा सुरू झाल्याने आणि धबधबे उशिरा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची संख्या कमी होती. परंतु गेले दहा दिवस या परिसरात पावसाने जोर धरल्याने घाटातील मुख्य धबधबा पूर्ण प्रवाहित झाला. त्यामुळे रविवारी गर्दी होणार हे निश्चित होते. परंतु अपेक्षेपेक्षा जादा गर्दी झाली. कावळेसाद पॉईंट, महादेवगड, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी, आंबोली पोलीस चेकपोस्ट, फॉरेस्ट चेकपोस्ट, सनसेट पॉईंट, पूर्वीचा वस देवस्थान आणि घाटातील मुख्य धबधबा परिसर अशा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठराविक अंतरावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.
पर्यटकांना खाली उतरविले
यावेळी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. पर्यटकांची गर्दी पाहता आणि पोलीस बंदोबस्त गेल्यानंतर सायंकाळी साडेपाचनंतर मुख्य धबधब्यावरून सर्व पर्यटकांना खाली उतरविण्यात आल्यानंतर घाटात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच पुन्हा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील स्टॉलधारकांनाही त्यांचे स्टॉल बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी आंबोली बाजारपेठ वाहनांनी फुलून गेली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा असल्याने आणि पार्किंग फुल्ल झाल्याने पर्यटक असूनदेखील हॉटेल व्यावसायिकांना फायदा झाला नाही. कारण वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटक थांबण्यास तयार नव्हते.









