गणेशचतुर्थी दोन महिन्यांवर : कार्यशाळेत रंगकाम-सजावट
बेळगाव : गणेशचतुर्थी दोन महिन्यांवर असली तरी मूर्तिकारांची लगबग शहरात पाहायला मिळत आहे. कार्यशाळेत गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांची धडपड सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या अधिक आहे. त्याबरोबरच घरगुती गणेशमूर्तीही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आतापासूनच गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांचे हात धडपडू लागले आहेत. विशेषत: कुटुंबांची संख्या वाढत असल्याने घरगुती गणेशमूर्तींची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आकारमानानुसार घरगुती गणेशमूर्ती कार्यशाळेत साकारू लागल्या आहेत. शहरात या मूर्ती रंगकाम व इतर सजावटीसाठी ने-आण सुरू आहे. त्याबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचीदेखील तयारी सुरू झाली आहे. आकर्षक आणि भव्य आकारांमध्ये या मूर्ती साकारू लागल्या आहेत. ऐन गणेशोत्सवावेळी मागणी वाढेल या आशेने मूर्तिकार अधिक मूर्ती तयार करून ठेवू लागले आहेत. त्यामुळे शहरात आतापासूनच गणेश मूर्तिकारांची धडपड पाहावयास मिळत आहे.









