चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची वर्दळ : दमदार पावसानंतर प्रवाह वाढणार
बेळगाव : मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे सुंडी (ता. चंदगड) येथील वझर धबधबा अखेर प्रवाहित झाला. त्यामुळे धबधब्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला होता. जुलै महिना उजाडला तरी समाधानकारक पाऊस नव्हता. त्यामुळे धबधबे ओस पडले होते. अखेर शनिवारपासून सुंडी येथील धबधबा प्रवाहित झाल्याने दिलासा मिळाला आहे. बेळगावपासून साधारण 20-25 कि.मी. अंतरावर असलेल्या आणि नैसर्गिकरीत्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या धबधब्याकडे तरुणांची पावले वळू लागली आहेत. रविवारी सुटी असल्याने वर्षा पर्यटनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दरवर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस होतो. त्यामुळे सर्वत्र नदी-नाले प्रवाहित होऊन धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळतात. मात्र, यंदा जुलैचा पहिला आठवडा आला तरी म्हणावा तसा पाऊस नसल्याने धबधबे कोरडे पडले आहेत. आता पावसाला सुरुवात झाल्याने पर्यटक बाहेर पडू लागले आहेत. बेळगाव परिसरातील पर्यटकांची आंबोली, सुंडी, किटवाड, पारगड यासह लहान धबधब्यांवर गर्दी वाढते. विशेषत: अलीकडे शहरापासून जवळ असलेल्या सुंडी आणि किटवाडच्या धबधब्यांवर गर्दी वाढू लागली आहे. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यानंतर नदी-नाले व ओढ्यांना पाणी येऊन धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होणार आहेत. वझर धबधबा मागील दहा-बारा वर्षात नावारुपाला आला आहे. त्यामुळे बेळगाव खानापूर यासह इतर ठिकाणांहून पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. बेळगाव-वेंगुर्लामार्गे शिनोळी (ता. चंदगड), शिनोळी फाटा ते देवरवाडीमार्गे धबधब्याकडे जाता येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस उशिराने दाखल झाल्याने धबधबा उशिराने प्रवाहित झाला आहे.









