तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी : शतकवीर रेहमानउल्लाह गुरबझ सामनावीर
वृत्तसंस्था/ चट्टोग्राम (बांगलादेश)
चट्टोग्राम येथे सुरु असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या अफगाणिस्तान संघाने 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांची ही मालिका एक सामना शिल्लक असतानाच खिशात घातली. या पराभवामुळे बांगलादेशवर आठ वर्षानंतर मायदेशात वनडे मालिका गमावण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या वनडे इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. उभय संघातील तिसरा व शेवटचा वनडे सामना दि. 11 रोजी खेळवला जाणार आहे.
प्रारंभी, बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. अफगाणिस्तानचे सलामीवीर रेहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झद्रन यांनी 36.1 षटकात 256 धावांची मोठी सलामी दिली. विशेष म्हणजे, सलामीला आलेल्या रेहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रन यांनी अफगाणिस्तानसाठी वनडेतील सर्वात मोठी भागीदारी केली. या जोडीने तुफानी फटकेबाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. गुरबाजने 125 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकारांसह 145 धावा तर इब्राहिमने 119 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 100 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव घसरला. अखेरच्या 13 षटकात 72 धावांमध्ये त्यांचे आठ गडी बाद झाले. यामुळे बांगलादेशला 50 षटकांत 9 बाद 331 धावा करता आल्या. मोहम्मद नबीने नाबाद 25 आणि नजीबुल्लाह झादरानने 10 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.
विजयासाठी मिळालेल्या 332 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फझलहक फारूख व मुजीब रहमान यांनी सुरुवातीपासूनच यजमान संघाचे कंबरडे मोडले. बांगलादेशचे पहिले सहा फलंदाज केवळ 72 धावांमध्ये परतले होते. अनुभवी मुशफिकुर रहीम याने अर्धशतक झळकावत बांगलादेशचा डाव सावरला. त्याने 69 धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे बांगलादेशचा डाव 43.2 षटकांत 189 वर संपुष्टात आला. फारुख व मुजीबने प्रत्येकी 3 तर रशीद खानने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 50 षटकांत 9 बाद 331 (गुरबाज 145, झद्रन 100, मोहम्मद नाबी नाबाद 25, मुस्तफिजूर रहमान, शकीब अल हसन, मेंहदी हसन मिराज प्रत्येकी दोन बळी)
बांगलादेश 43.2 षटकांत सर्वबाद 189 (मुशफिकुर रहीम 69, शकीब 25, मेंहदी हसन 25, फारुख व मुजीब प्रत्येकी तीन बळी, रशीद खान दोन बळी).
शकीबची ऐतिहासिक कामगिरी, मायदेशात घेतले 400 बळी
अफगाणविरुद्ध दुसऱ्या सामन्यात शाकिबने दोन बळी घेत मायदेशात आपल्या 400 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो जगातील पाचवा फिरकी गोलंदाज तर एकूण नववा गोलंदाज ठरला आहे. शकीब हा आपल्या देशात 400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा जगातील पाचवा फिरकी गोलंदाज आहे. यासोबतच बांगलादेशच्या माजी कर्णधारानेही दिग्गजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे. केवळ मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदानांच मायदेशात 400 बळी घेता आले आहेत.









