वृत्तसंस्था/ लंडन
विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत कझाकच्या इलेना रायबाकिनाने ब्रिटनच्या केटी बोल्टरचे आव्हान संपुष्टात आणत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. याशिवाय इटलीचा मॅटेव बेरेटिनी, होल्गर रुने, जिरी लेहेका, कार्लोस अल्कारेझ, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपस, मॅडिसन कीज, एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा, ट्युनिशियाची ऑन्स जेबॉर, पेत्र क्विटोव्हा यांनीही एकेरीची चौथी फेरी गाठली. अलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान मात्र तिसऱ्या फेरीत समाप्त झाले.

रायबाकिनाने ब्रिटनच्या बोल्टरचा 6-1, 6-1 असा एकतर्फी धुव्वा उडवित चौथी फेरी गाठली. रशियाच्या एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाने डाल्मा गाल्फीचा 6-0, 6-4 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी तिची लढत साबालेन्काशी होणार आहे. सहाव्या मानांकित जेबॉरनेही सलग तिसऱ्यांदा चौथी फेरी गाठताना बियान्का अँड्रीस्क्यूचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. ही संघर्षपूर्ण लढत 1 तास 48 मिनिटे चालली होती. अमेरिकेच्या मॅडिसन कीजने बिगरमानांकित मार्टा कोस्ट्युकचा 6-4, 6-1 असा पराभव केला. पेत्र क्विटोव्हाने नतालिया स्टेव्हानोविकवर 6-3, 7-5 अशी मात केली.

पुरुष एकेरीत जागतिक तिसऱ्या मानांकित डॅनील मेदवेदेव्हने हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सचे कडवे आव्हान 4-6, 6-4, 6-4, 6-4 असे परतावून लावत आगेकूच केली. तीन तास ही लढत रंगली होती. त्याची पुढील लढत लेहेकाशी होईल. पाचव्या मानांकित सित्सिपसने लॅस्लो डेअरवर 6-4, 7-6 (7-5), 6-4 अशी दोन तासांच्या लढतीत मात केली. त्याची लढत ख्रिस्तोफर युबँक्सशी होईल.
अन्य सामन्यात बेरेटिनीने जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान 6-3, 7-6 (7-4), 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. त्याची पुढील लढत कार्लोस अल्कारेझशी होईल. सहाव्या मानांकित व्होल्गर रुनेने आगेकूच करताना अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनावर पाच सेट्सच्या झुंजीत 6-3, 4-6, 3-6, 6-4, 7-6 (10-8) अशी मात केली. मागील वर्षी तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. टायफो किंवा डिमिट्रोव्ह यापैकी एकाशी त्याची चौथ्या फेरीची लढत होईल. जिरी लेहेकाला 16 व्या मानांकित टॉमी पॉलला 6-2, 7-6 (7-2), 6-7 (5-7), 6-7 (9-11), 6-2 असे हरविताना कडवा संघर्ष करावा लागला.









