वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हेंगझोयु येथे 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनने 10 सदस्यांचा बुद्धिबळ संघ जाहीर केला असून यामध्ये दुहेरी सुवर्णपदक विजेती कोनेरु हंपी आणि कांस्यपदक विजेती द्रोणावली हरिका यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे येत्या डिसेंबरात भारतात चेस लीड स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेंगझोयुमधील होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 10 सदस्यांच्या भारतीय बुद्धिबळ संघामध्ये पुरुष विभागात जी. गुकेश, विदित गुजराती, अर्जुन इरीगेसी, पी. हरीकृष्णा आणि आर. प्रज्ञानंद तसेच महिला विभागात कोनेरु हंपी, द्रोणावली हरिका, आर. वैशाली, वंतिका अगरवाल आणि सविताश्री यांचा समावेश आहे. भारतीय बुद्धिबळ संघाने अलीकडेच ग्लोबल बुद्धिबळ लिग स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेमध्ये नॉर्वेचा ग्रँडमास्टर तसेच पाचवेळा विश्वविजेतेपद मिळवणारा मॅग्नस कार्लसन तसेच अन्य देशांच्या अव्वल बुद्धीबळपटूंची खेळण्याची संधी भारतीय बुद्धीबळपटूंना उपलब्ध झाली होती.
कानपूरमध्ये अलीकडेच झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनच्या संजय कपुर यांच्या अध्यक्षतेखालीच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये 36 वर्षीय कोनेरु हंपीने आपण चीनमधील होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा कोरोनाच्या भीतीने सहभागी होणार नसल्याचे सांगितले. डोहा येथे 2006 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कोनेरु हंपीने महिलांच्या वैयक्तीक तसेच मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत डी. हरिकाने वैयक्तीक कास्यपदक मिळवले होते. तब्बल 13 वर्षानंतर बुद्धिबळ या क्रीडा प्रकाराचे आशियाई स्पर्धेत पुनरागमन होत आहे.
अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनतर्फे इंडियन चेस लिग स्पर्धा चालू वर्षाच्या डिसेंबर महिन्यात भरवण्याची योजना आखली आहे. येत्या 15 दिवसामध्ये या स्पर्धेचा आराखडा जाहीर केला जाईल. आयपीएलच्या धर्तीवर सदर स्पर्धा घेतली जाणार असून यामध्ये 6 ते 8 संघांचा समावेश राहिल. भारताचा विश्वनाथन आनंद हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनचा उपाध्यक्ष आहे.









