डॅनी वॅट मालिकावीर, अॅलिस कॅप्से सामनावीर
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. लॉर्ड्स मैदानावर या मालिकेतील शनिवारी झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 5 गड्यांनी पराभव केला. 2017 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन महिला संघाला इंग्लंडविरुद्धची मालिका गमवावी लागली आहे.
या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 बाद 155 धावा जमवल्या. त्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी इंग्लंडला 14 षटकात 119 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. इंग्लंडने 13.2 षटकात 5 बाद 121 धावा जमवत हा सामना 4 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये कर्णधार हिलीने 10 चेंडूत 3 चौकारासह 16, मुनीने 27 चेंडूत 5 चौकारासह 32, मॅकग्राने 13 चेंडूत 2 चौकारासह 10, गार्डनरने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 32, एलीस पेरीने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 34, हॅरीसने 15 चेंडूत 3 चौकारासह 25 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 19 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे नॅट स्किव्हेर ब्रंटने 31 धावात 2 तर डीन, बेल, गिब्सन आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये अॅलिस कॅप्सेने 23 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 46, डंक्लेने 10 चेंडूत 1 चौकारासह 9, डॅनी वॅटने 15 चेंडूत 6 चौकारासह 26, नॅट स्किव्हेरने 25 चेंडूत 2 चौकारासह 25, कर्णधार नाईटने 1 चौकारासह 6 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे स्कूटने 2 तर ब्राऊन, जोनासेन आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नॅट स्किव्हेर ब्रंट आणि कॅप्से यांनी तिसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. आता ही टी-20 मालिका समाप्त झाल्यानंतर उभय संघामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ब्रिस्टॉल येथे येत्या बुधवारपासून प्रारंभ होत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघामध्ये सुरू असलेल्या या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने एकमेव कसोटी सामना जिंकून इंग्लंडवर आघाडी मिळवली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. इंग्लंडने या टी-20 मालेकेतील दोन सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने या अॅशेस मालिकेत इंग्लंडवर 6-4 अशा गुणांनी आघाडी घेतली आहे. अॅशेस मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडच्या महिला संघाला आगामी होणाऱ्या वनडे मालिकेतील तीनही सामने जिंकावे लागतील. वनडे प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने अलीकडच्या कालावधीत सलग 15 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. लॉड्सच्या या सामन्याला सुमारे 20 हजार शौकीन उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकात 7 बाद 155 (हिली 3 चौकारासह 16, मुनी 5 चौकारासह 32, मॅकग्रा 2 चौकारासह 10, गार्डनर 1 षटकार आणि 3 चौकारासह 32, पेरी 1 षटकार आणि 3 चौकारासह 34, हॅरीस 3 चौकारासह 25, अवांतर 2, नॅट स्किव्हेर ब्रंट 2-31, डीन, बेल, गिब्सन, इक्लेस्टोन प्रत्येकी एक बळी), इंग्लंड (14 षटकात विजयासाठी 119 धावांचे नवे उद्दिष्ट) 13.2 षटकात 5 बाद 121 (डंक्ले 1 चौकारासह 9, वॅट 6 चौकारासह 26, नॅट स्किव्हेर 2 चौकारासह 25, कॅप्से 2 षटकार आणि 4 चौकारासह 46, नाईट 1 चौकारासह 6, गिब्सन 1 चौकारासह नाबाद 4, अवांतर 5, स्कूट 2-35, ब्राऊ, जोनासेन, वॉरहेम प्रत्येकी एक बळी).









