वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिवंगत नेते आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पास्वान यांचे पुत्र चिराग पास्वान यांनी रालोआत परण्याची सज्जता केली आहे. काही वर्षांपूर्वी ते या भाजपप्रणित आघाडीपासून दूर गेले होते. तथापि, लवकरच त्यांचा पुनर्प्रवेश होण्याची शक्यता आहे. 18 जुलैला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक होणार असून या बैठकीत ते ही घोषणा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून आपण नेहमीच त्यांचे समर्थक राहिलो आहोत. मध्यंतरीच्या काळात काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला होता. तो आता दोन्ही पक्ष दूर करणार आहेत, असे प्रतिपादन पास्वान यांनी केले. त्यांनी रविवारी आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली होती. या बैठकीतच त्यांच्या रालोआत परतीचा मार्ग मोकळा करण्यात आला असे बोलले गेले. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली.
अन्य पक्षही परतणार ?
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर रालोआपासून दूर गेलेले आणखी काही पक्ष आघाडीत परत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरील त्यांच्या गटाचा अधिकार सिद्ध केल्यानंतर ते आपल्या पक्षासह रालोआत येत आहेत. 18 जुलैच्या बैठकीला ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अजितदादा पवार हे अनेक आमदारांसह नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले असून तेही आपल्या गटासह रालोआत येतील अशी शक्यता आहे. अकाली दल हा जनसंघाच्या काळापासूनचा भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष पुन्हा रालोआत येऊ इच्छित आहे, अशी चर्चा आहे. या संबंधात येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. एकंदर, आता लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज होत आहेत. आणखी 10 महिन्यांनंतर लोकसभा निवडणूक होणार आहे.









