वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील हिंदू युवकाच्या प्रेमात पडलेल्या आणि त्याला मिळविण्यासाठी भारतात बेकायदा मार्गाने आलेल्या पाकिस्तानी महिलेने हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची घोषणा केली आहे. सीमा नामक ही मुस्लीम महिला तिच्या चार अपत्यांसह नेपाळमार्गे भारतात आली आहे. तिला अटक करण्यात आली होती. मात्र आता तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
ही महिला मध्यवयीन असून तिचा पाकिस्तानात विवाह झालेला आहे. तथापि, तिच्या सासरच्या माणसांनी आणि तिच्या पतीने तिचा प्रचंड छळ केला, असा तिचा आरोप केला. याच काळात सोशल मिडियावरुन ती भारतातील सचिन नामक हिंदू युवकांच्या प्रेमात पडली. त्याच्याशी विवाह करण्यासाठी ती नेपाळमार्गे लपून छपून भारतात आली आहे. याचा सुगावा लागताच तिला अटक करण्यात आली होती.
हिंदू धर्म स्वीकारला
पाकिस्तानात आपल्यावर अत्याचार करण्यात आले. आपला छळ करण्यात आला. त्याला कंटाळून आपण आपल्या चार अपत्यांसह भारतात आलो आहोत. भारताता आल्यानंतर आपण हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. आपल्या मुलांची नावेही आपण परिवतर्तित केली असून हिंदू नावे ठेवली आहेत, असे तिने स्पष्ट केले आहे. ती सध्या तिचा प्रियकर सचिन याच्याबरोबरच रहात आहोत. आपल्याला भारताबाहेर काढू नये. येथेच राहू द्यावे, अशी विनंती तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. तिचा पुढील तपास सुरु आहे.
घटस्फोट मिळाल्याचे प्रतिपादन
तिचा पाकिस्तानी पती सौदी अरेबियात कामाला आहे. त्याने व्हिडीओ प्रसारित करुन तिला पाकिस्तानला पाठविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तिचा विवाह झाल्याने ती धर्माच्या कारणास्तव भारतात जाऊ शकत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, पतीने आपल्याला फोनवरुन तलाक दिला असल्याने आपण घटस्फोटीत आहोत. आपण पतीच्या बंधनात नाही, असे तिचे म्हणणे आहे. पाकिस्तानात पाठविण्यात आल्यास आपली हत्या करण्यात येईल. त्यापूर्वी आपला आणखी छळ करण्यात येईल, अशी भीती तिने व्यक्त केली आहे.









