अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा ब्रह्मज्ञानाचा उपयोग करून साधक संशय रहित होतात. संदेहाचा नाश झाल्यावर, द्वैताची बोळवण होते आणि सर्वत्र एकच ब्रह्म भरून राहिले असल्याची येथून पुढे सदैव जाणीव होते. अशी जाणीव झाल्यावर मी तू पणाचे निर्दालन होऊन ते समूळ नष्ट होते आणि साधक स्वानंदात निमग्न होतो.
साधकाच्या मनात वर्णाश्रम, कुळ जाती ह्यामुळे किंवा जीवशिवादि पदस्थिती समजल्याने अहंकार निर्माण होत नाही. ह्यालाच उपरती असे म्हणतात. त्याला विषयभोगाविषयी बिलकुल प्रेम वाटत नसते. ह्याप्रमाणे कायमच कोणतीही अपेक्षा नसलेला साधक आत्माराम झालेला असतो. सर्वसामान्य माणसाला त्याच्या देहाचा कोण अभिमान असतो. साधकाचा देह आणि इंद्रिये शाबूत असताना त्याचा देहाभिमान कसा जात असेल? तर त्याबद्दल सांगतो, ऐक, त्यासाठी आत्मा म्हणजे नक्की काय ते समजून घे. माणसाचा देह म्हणजे आत्मा नव्हे. देह वगळला तर प्राण उरतो पण तोही आत्मा नव्हे. तसेच पंचमहाभुते हीही आत्मा नव्हेत. कारण त्यांच्यात निरनिराळे दोष असतात आणि आत्मा तर दोषरहित असतो. मनात आत्म्याचा वास नसतो.
अंत:करणाला आत्मा म्हणता येत नाही कारण ते नाश पावणारे आहे तर चित्त चिंतन करणारे असल्याने त्याला आत्मा म्हणता येत नाही. माणसाच्या अभिमानाला सुखदु:खाचे बंधन असल्याने त्यालाही आत्मा म्हणता येणार नाही. बुद्धी तसेच त्रिगुणांना आत्मा म्हणता येत नाही. महतत्त्वही आत्मा नसते कारण त्यातून तर गुणाची निर्मिती होते. प्रकृतीत गुणांची साम्यावस्था असली तरी प्रकृती मिथ्या आहे. आत्मा हा निर्विकार, जन्म मृत्यूहून वेगळा, अमर, स्थिर आणि निश्चळ असून त्याला कुणीही जाळू, चिरू, भिजवू शकत नाही. त्याला कुणीही बघू शकत नाही. तो देहेंद्रियापेक्षा वेगळा आहे हे ज्यांनी समजून घेतले आहे त्यांना इंद्रियांच्या लाभ हानीशी काहीच देणे घेणे नसते. त्यांना त्यांच्या आत्मस्वरुपाची ओळख झालेली असल्याने इंद्रियांशी त्याचा काहीच सबंध उरत नाही. ज्याप्रमाणे मांत्रिक दोराचे सर्पात रुपांतर करतात आणि बिनधास्त त्याला धरून त्याचे खेळ दाखवतात कारण त्यांना माहित असते की, दोरीच्या सापापासून त्यांना कोणतेच भय नाही. त्याप्रमाणे देहेंद्रीयाच्या अस्तित्वाला साधकाच्या लेखी काहीच अर्थ उरलेला नसतो. त्यामुळे त्यापासून होणाऱ्या लाभहानीला तो किंमत देत नाही. ज्याला माझे अपरोक्ष ज्ञान झालेले असेल त्याने एका आसनावर बसून माझे अखंड ध्यान केले तर त्याला त्याचा अधिक लाभ मिळतो. मी त्यांच्या शरीरात प्रकट झालो की ते भवसागरी बुडत नाहीत. तसेच प्रारब्धानुसार इंद्रियांची संगत लाभून दैवयोगाने किंवा प्रारब्धानुसार विषयोपभोग भोगायला मिळाले तरीही त्याची ब्रह्मस्थिती भंगत नाही कारण साधकाला माझे स्वयंप्रकाशीत स्वानंदघन असलेले निजधाम प्राप्त झालेले असते. त्यामुळे त्याला विषय बाधत नाहीत. येथून पुढे भगवंत सूर्याचे उदाहरण देऊन ते स्वत: कसे ह्या संसारापासून अलिप्त आहेत ते सांगत आहेत. ते म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर लोक झोपेतून उठून आपापल्या कामाला लागत असले तरी त्यांच्या त्या कृतीपासून सूर्य संपूर्णपणे अलिप्त असतो कारण त्याला त्यांच्या कर्माशी काहीही देणेघेणे नसते. त्याप्रमाणे मी परमात्मा स्वयंज्योती असून माझ्या प्रकाशाने समस्त विश्वाला कार्य करण्याची ऊर्जा देत असलो तरी त्यापासून मी निश्चित अलिप्त असतो. उद्धव म्हणाला देवा, तुम्ही सांगताय ते मला पटले. तुम्ही स्वत: विश्वापासून तसेच सूर्यदेव जगाच्या व्यवहारापासून अलिप्त आहेत हे मी मान्य करतो परंतु मुक्तपुरुष तर स्त्राrपुत्र, घरदार ह्यात गुंतलेला असतो मग त्याला मी तो नि:संग आहे असे कसे म्हणू? उद्धवाच्या ह्या प्रश्नाचे उत्तर भगवंत पुन्हा सूर्याचेच उदाहरण देऊन सांगणार आहेत.
क्रमश:








