आध्यात्मिक जीवनामध्ये उपवासाला अत्याधिक महत्त्व दिले जाते. आपण शरीर नसून आत्मा आहोत याचा साक्षात्कार शरीराशी निगडित असलेल्या क्रिया म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन यावर नियंत्रण केल्यानेच अनुभवास येतो. यासाठी भागवत शास्त्रांमध्ये आणि संतांच्या शिकवणीमध्ये आपल्याला एकादशीसारख्या उपवासाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात, जया नाही नेम एकादशीव्रत। जाणावे ते प्रेत सर्वलोकी ।।1।। त्याचे वय नित्य काळ लेखिताहे। रागे दांत खाय करकर।।2।। जयाचिये द्वारी तुलसी वृन्दावन । नाही ते स्मशान गृह जाणा।।3।। जये कुळी नाही एकही वैष्णव । त्याचा बुडे भवनदी ताफा ।।4।। विठेबांचे नाम नुचारी जें तोंड । प्रत्यक्ष ते कुंडचर्मकाचे ।।5।। तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना न जाय हरिचिया ।।6।। अर्थात ‘जो एकादशीचे व्रत नित्यनियमाने पाळत नाही, तो मनुष्य सर्व लोकात प्रेत आहे असे जाणावे. ‘काळ’ त्याचे आयुष्य नित्य मोजीत असतो व रागाने त्याच्यावर करकर दात खात असतो. ज्याच्या घराच्या दारात तुलसी वृंदावन नाही, ते घर स्मशानाप्रमाणे आहे असे समजावे. ज्याच्या कुळात एकही वैष्णव जन्माला आला नाही त्याची संसारसागर तरून जाण्याची नाव बुडाली आहे असे समजावे. जे तोंड विठोबाचे नाव उच्चारित नाही ते तोंड म्हणजे चामडे बुडवायचे चांभाराचे कुंड आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य हरिकीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय म्हणजे निर्जीव लाकडेच समजावीत.’
वैष्णव म्हणजे विष्णूच्या अथवा श्रीकृष्णाच्या भक्ताला गीता-भागवत आणि इतर वैदिक शास्त्रानुसार काही आचारधर्म पाळण्यास सांगितले आहेत. त्यात प्रामुख्याने वैष्णवांचे उपास्य दैवत विष्णू असावे, त्याने एकादशी व्रत पालन करावे, त्याच्या दारात तुलसी वृन्दावन असावे, त्याने हरिनामाचा जप करावा, त्याने हरिकथा कीर्तनास जावे याचा प्रामुख्याने समावेश होतो. पद्म पुराणामध्ये कृष्ण भगवान सांगतात, वनस्पतीना तुलसी मासानां कार्तीक: प्रिय: । एकादशी तिथिनां च क्षेत्रानां द्वारका मम ।। अर्थात वनस्पतींमध्ये तुलसी, महिन्यामध्ये कार्तिक मास, तिथींमध्ये एकादशी आणि क्षेत्रांमध्ये द्वारका मला अतिशय प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी उपवास करून जास्तीत जास्त वेळ हरिकथा व हरिकीर्तन यासाठी द्यावा हा मुख्य हेतू असतो. अन्नपाणी वर्ज्य करून भगवंताजवळ एकचित्ताने राहणे हे सर्व उपवासाचे रहस्य आहे. उपवास केल्याने आपण शरीर नसून आत्मा आहोत हा अनुभव येण्यास मदत होते. या दिवशी शारीरिक क्रिया कमीत कमी करण्याचा वैष्णवांचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे तुलसी ही भगवंतांना प्रिय असल्याने प्रत्येकाच्या घरासमोर तुलसी वृन्दावन असावे. वैष्णवाच्या संगतीमध्ये भगवत्भक्ती करणे सोपे असते त्यासाठी प्रत्येक घरात एक तरी वैष्णव असावा. जो भवसागरातून आपली सुटका करू शकेल. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे (2.3.20 आणि 22) बिले बतोरुक्रमविक्रमान् ये, न शृण्वत: कर्णपुटे नरस्य । जिव्हासती दार्दुरिकेव सूत, न चोपगायत्युरुगायगाथा:
अर्थात भगवंतांच्या दिव्य लीलांचे वर्णन ज्याने ऐकलेले नाही आणि गायिलेले नाही त्यांचे कान म्हणजे सर्पाची बिळे आणि जिव्हा म्हणजे बेडकांची जिव्हाच असल्याचे समजावे. पादौ नृणां तौद्रुमजन्मभाजौ, क्षेत्राणि नानुव्रजतो हरेर्यौ? अर्थात जे पाय तीर्थक्षेत्री म्हणजे जेथे हरिकथा व हरिकीर्तन केले जाते त्याठिकाणी जात नसतील तर ते पाय म्हणजे वृक्षाचे बुंधेच आहेत. थोडक्यात सांगावयाचे तर जो मनुष्य भगवत भक्तीमध्ये आपले शरीर उपयोगात आणत नसेल तर ते शरीर जिवंतपणीच मृत समजावे. त्याचे आयुष्य ‘काळ’ संपवतो आहे.
दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन ते एक।।1।। एक व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशी ।।2।। अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षिता तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ।।3।। सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ।।4।।आपण न वजे हरिकीर्तना। आणिकां वारी जाता कोणा । त्याच्या पापे जाणा । ठेंगणा तो महामेरू ।।5।। तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया ।।6।। अर्थात ‘एकादशी दिवशी जे अन्न खातात, असे लोक अधम आहेत. या थोर एकादशीचे माहात्म्य असे आहे की जे लोक या दिवशी हरिकीर्तन करतात, हरिकथा करतात, ऐकतात, ते विष्णुसमान आहेत. या दिवशी जो पानविडा खाईल, तर त्याने विटाळ स्त्राrचे रक्त पिल्यासारखे आहे आणि त्याची प्रबळ काळाच्या हातून सुटका होत नाही. या दिवशी जो चांगली शय्या करून स्त्राrशी विलासभोग करतो त्याला क्षयरोग जडतो आणि जन्म-मृत्यूचे भयंकर दु:ख भोगावे लागते. अशी व्यक्ती आपण स्वत: हरिकीर्तनाला जात नाही आणि कोणी जात असेल तर त्याला अडथळा आणते, त्याच्या पापांपुढे मेरु पर्वतसुद्धा ठेंगणा वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व्रत पालन न करणारे यमदूतांच्या अधीन होतात, आणि यमदूत त्यांना शिक्षा देतात.’
हरिभक्तांना आणि हरिभक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या वैष्णवांना एकादशीचे महत्त्व विशेष वाटते. एकादशीच्या दिवशी उपवास करून जास्तीत जास्त वेळ हरिकथा व हरिकीर्तन यासाठी द्यावा हा मुख्य हेतू असतो. अन्नपाणी वर्ज्य करून भगवंताजवळ एकचित्ताने राहणे हे सर्व उपवासाचे रहस्य आहे. उपवास केल्याने आपण शरीर नसून आत्मा आहोत हा अनुभव येण्यास मदत होते. या दिवशी शारीरिक क्रिया कमीत कमी करण्याचा वैष्णवांचा प्रयत्न असतो. येथे विष्णुसमान याचा अर्थ गुणात्मकदृष्ट्या म्हणजे सत्चिदानंद अवस्थेमध्ये जीवात्मा पोचू शकतो. भगवान विष्णूचा सेवक असणे हा जीवांचा स्वभाव आहे त्याला प्राप्त करणे म्हणजे सत्चिदानंद स्थिती प्राप्त करणे. यासाठीच मनुष्य जन्म प्राप्त होतो. पण यासाठी मनुष्य देहाचा उपयोग न करता केवळ इंद्रियतृप्ती केल्यास पुन्हा आपल्याला दु:ख प्राप्त होते. असे दुर्दैवी जीव यमदूतांच्या अधीन होऊ नयेत म्हणून तुकाराम महाराज या अभंगात आपल्याला एकादशी करण्याचे महत्त्व समजावून सांगत आहेत.
आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात एकादशी व्रत सोमवार न करिती। कोण त्यांची गत होईल नेणो ।।1।।काय करूं बहू वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ।।2।। अर्थात ‘एकादशी आणि सोमवार ही व्रते जे करीत नाहीत त्यांची गती काय होणार कळत नाही. सर्व लोक भक्तीविषयी आंधळे व भोगाविषयी बहिर्मुख असलेले बघून त्यांच्याविषयी तळमळ वाटते.’
सर्वसामान्यपणे उपवास याचा अर्थ लोक उपाशी राहणे असा समजतात आणि तो कोणत्याही दिवशी कोणासाठीही केला तरी चालतो असा लोकांचा गैरसमज आहे. परंतु भागवत धर्मानुसार उपवास याचा अर्थ आहे, ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे बसणे. भगवंताजवळ बसणे असा त्याचा अर्थ आहे. या दिवशी शारीरिक क्रिया म्हणजे विशेषत: आहार, निद्रा, भय आणि मैथुन कमीत कमी करणे अथवा पूर्णपणे मुक्त राहणे आणि जास्तीत जास्त हरिकथा, हरिकीर्तन, हरिनाममध्ये मन गुंतवणे यासाठी वैष्णव भक्त प्रयत्नशील असतात. वैष्णव साधुसंताना जे लोक आपला मनुष्य जीवनाचा उपयोग भगवत्भक्तीसाठी करीत नाहीत त्याच्याबद्दल कळवळा वाटतो, आणि याच तळमळीतून करुणाभावनेने समाजाला शिक्षित करण्यासाठी गीता-भागवत शास्त्रावर आधारित आदेश सामान्य जनांसाठी ते प्रसार आणि प्रचार करतात. एकादशी व्रताचे महत्त्व समजून देण्यासाठी वरील आशयाचे अभंग संत तुकारामांनी लिहिले आहेत.
-वृंदावनदास








