लोणावळा / प्रतिनिधी :
वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पुण्या-मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांनी शनिवारी व रविवारी हाऊसफुल्ल गर्दी केली. शनिवार व रविवार दोन्ही दिवस शहरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते व भुशी धरणाकडे जाणार्या मार्गावर वाहनेच वाहने दिसत होती.
मागील आठवड्यात शहर व ग्रामीण भागात झालेल्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व ग्रामीण दोन्ही पोलीस ठाण्यांना मुख्यालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यात आला. तसेच पोलीस स्वंयसेवक दलाची स्थापना नि दोन्ही दिवस पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे वाहनांची गर्दी होऊनही कोंडीचा फार फटका पर्यटकांना बसला नाही. जागोजागी पोलीस तैनात राहिल्याने धिम्म्या गतीने का होईना वाहने पुढे सरकत होती. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहने थांबविण्यास मज्जाव केला होता. तसेच ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे डायव्हर्जन, वन वे वाहतूक केल्याने वाहेन पुढे निघून जात होती.
शनिवारपासून लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, भुशी धरण व लायन्स पाॅइंटकडे जाणारा मार्ग, भाजे लेणी, कार्ला लेणीकडे जाणारे रस्ते, लोहगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता, लोणावळा-पवनानगर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मळवली भाजे रोडवरील अतिक्रमणे पोलिसांनी हटवली होती, तर कार्ला फाटा येथे वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. यामुळे काही व्यावसायकांना तोटा सहन करावा लागला. मात्र, रस्ता मोकळा राहिल्याने स्थानिक व पर्यटक यांना दिलासा मिळाला.