ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्याच्या विकासाच्या मुद्यावरुन आम्ही सत्तेत सहभागी झालो. सत्तेत सहभागी झालो याचा अर्थ भाजपमध्ये प्रवेश केला असा नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र आहे. सरकारमध्ये राहून आम्ही प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहोत. अजित पवारांबरोबर जाण्याचा मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. उद्याच्या निवडणुकीत काय होईल, याची मला चिंता नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
वळसे-पाटील म्हणाले, अजित पवारांबरोबर सत्तेत जाण्यात माझं कोणतंही वैयक्तिक हित नाही. कारण मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस नाही. शरद पवार यांच्याशीही माझे कोणतेही मतभेद नाहीत. पण आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची कामं करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेच होतं. हा निर्णय घेताना एकीकडे तालुक्याचा प्रश्न तर दुसरीकडे पवार साहेबांवरील प्रेम असा पेच निर्माण झाला होता. पण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सत्तेत अजित पवारांसोबत गेलो. मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. मला भविष्याची चिंता नाही.
रोहित पवारांमुळे तुम्ही अजितदादांसोबत गेलात या प्रश्नावर ते म्हणाले, रोहित पवार यांचं वय 37 आणि मी राजकारणात आहे 40 वर्ष. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं. माझी आणि रोहित पवारांची एकदाच भेट झाली. तुमचा मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा, असे मी त्यांना सांगितलं होतं. त्यामुळं या व्यतिरिक्त माझं कोणतंही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाणार नाही, असेही ते म्हणाले.








