फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांची मागणी : सरकारने आता तरी जागे व्हावे
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावचे आरोग्य केंद्र असलेल्या पोर्तुगीजकालीन वारसा इमारतीचा भाग शनिवारी पहाटे कोसळल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आता तरी झोपी गेलेल्या आमच्या सरकारने जागे व्हावे व प्रशासकीय वापरात असलेल्या ‘वारसा इमारतीं’चे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे, अशी मागणी केली आहे.
सदर इमारतीचा भाग पहाटेच्या वेळी कोसळल्याने जीवितहानी टळली, असे ते म्हणाले. या इमारती मातीचा वापर करून उभारल्या गेल्या आहेत. त्यांचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे आपण मागील विधानसभा अधिवेशनात खासगी वारसा इमारतींचे जतन करण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, असे सूचित केले होते. ते तर सरकारकडून होणार नाहीच. मात्र आता मडगाव पालिकेची जुनी इमारत, हॉस्पिसियो इस्पितळाची जुनी इमारत या कोसळणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना राबवावी, असे सरदेसाई म्हणाले.
देखभालीविना इमारती सुरक्षित कशा राहणार ?
सरकार ‘जी20’साठी 300 कोटी ऊपयांची उधळण करताना दिसत आहे, मात्र शेकडो वर्षांच्या वारसा इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ न करता गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालत आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली. गोवा मुक्तीनंतर आम्ही मोठे पूल कोसळताना पाहिले. त्यामुळे अशा इमारती सततच्या देखभालीविना कशा सुरक्षित राहतील, असा सवाल त्यांनी केला.
आपण हॉस्पिसियोच्या इमारतीला रंगरंगोटी करण्यासाठी पुढाकार घेतला असता आमदार दिगंबर कामत यांनी पोलीस फौजफाटा ठेवून आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. पक्ष बदलताना देव त्यांच्याशी बोलला होता. आता विपरित घटना घडणार असल्याचे देव त्यांना सांगत नाही काय, असे म्हणत सरदेसाई यांनी मडगावच्या आमदारांवर शरसंधान करण्याची संधी सोडली नाही.
मडगाव आरोग्य केंद्राची ही इमारत भौगोलिकदृष्ट्या फातोर्डा मतदारसंघात येत असूनही येथे येण्यास आपणास उशीर का झाला असा सवाल पत्रकारांनी केला असता त्यांनी सांगितले की, आपण बाहेरगावी होतो. आताच परतलो असता लगेच भाग कोसळलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी नगरसेवक फ्रान्सिस जोनास, रवींद्र नाईक तसेच दुर्गादास कामत व अन्य उपस्थित होते.









